गरिबांचे न्यायाधीश


भारताचे १७ वे सरन्यायाधीश न्या. पी. एन. भगवती यांचे काल वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. आजवर हे पद उपभोगलेल्या इतर न्यायमूर्तींची माध्यमांनी फार दखल घेतलेली दिसत नाही. काही न्यायमूर्ती चांगले काम करतात पण एकदा ते निवृत्त झाले की त्यांची कोणीही दखल घेत नाही पण न्या. भगवती यांना निवृत्त होऊन ३० वर्षे उलटली असूनही त्यांच्या निधनाचे वृत्त अनेकांना व्यथित करणारे ठरले कारण त्यांचे या पदावरून केलेले काम मोठे होते. त्यांनी भारतातल्या न्यायव्यवस्थेला नवे वळण दिले होते. ते वळण फार दूरगामी ठरले. त्यातूनच न्यायालयाची सक्रियता हा विषय चर्चेला आला. देशातल्या गरीब माणसावर अन्याय झाला तर त्याला दाद मागता येत नाही. त्याच्या वतिने अन्य कोणालाही जनहित याचिका दाखल करता आली पाहिजे हा विचार न्या. भगवती यांना राबविला|

न्या. भगवती यांना त्यामुळेच जनहित याचिकांचे जनक मानले जाते. १९८५ साली सरन्यायाधीश म्हणून काम करीत असताना त्यांनी अमेरिकेतल्या अशाच एका तरतुदीचे अनुकरण करणारा जनहित याचिका हा प्रकार सुरू केला. त्यामुळेच सरकारच्या कारभाराच्या विरोधात कोणीही नागरिक उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करायला लागले. अशा याचिकांचे निकाल देताना न्यायालये सरकारवर ताशेरे झाडायला लागली आणि सरकारच्या कारभारावर अंकुश बसवला गेला. विशेषत: भ्रष्टाचाराच्या संबंधात काही मंत्र्यांना उघडे पाडण्यास जनहित याचिकांचे हत्यार कामास आले. अनेकदा न्यायालयात खटले प्रलंबित राहतात आणि या काळात अर्जदार बराच लूटला जातो. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात.

म्हणून प्रलंबित खटल्यातील वादी प्रतिवादी थकले असतील तर त्यांचा खटला न्यायालयाच्या बाहेर सामोपचाराने निकाली काढला जावा ही कल्पना न्या. भगवती यांंनी मांडली. तिलाच नंतर लोक अदालत असे नाव देण्यात आले. आपल्या देशात कायद्या समोर सर्वजण समान असतात असे मानले जाते. पण तरीही गरीब माणसाला न्याय मागणेही दुरापास्त होते. त्याला ते शक्य व्हावे यासाठी त्याचा ज्या कायद्याशी संबंध येतो त्या कायद्याला धरून त्याचे प्रशिक्षण केले जावे आणि न्या. भगवती यांनी त्यासाठी कायदा सल्ला यंत्रणा निर्माण केल्या. असे गरिबांना न्याय देणार्‍या सुधारणा करणारे हे न्यायमूर्ती आपल्यातून गेले आहेत. अर्थात ते गेले असले तरीही त्यांची स्मृती कायम राहणार आहे. न्यायाधीशाला कायद्यात जे काही दिले आहे त्यानुसार न्याय द्यायचा असतो किंवा निवाडा करायचा असतो पण न्या. भगवती यांनी त्या पलीकडे जाऊन जनतेसाठी न्याययंत्रणा राबवली आणि तिला गरिबांच्या कक्षेत आणले.

Leave a Comment