यादी शांततापूर्ण देशांची


मनुष्य प्राणी हा सुखासाठी धडपडणारा प्राणी आहे. वैशिष्ट्य म्हणजे तो सुखासाठी जेवढा धडपडतो तेवढा अधिक दुःखी होत जातो. कारण सुख मिळवण्यासाठी तो भौतिक सुविधांवर भर देतो. अशा भौतिक सुविधांनी माणूस सुखी होत नसतो हे त्याला कळत नाही. म्हणूनच कमीत कमी भौतिक सुविधा उपलब्ध असणारा भूतानसारखा मागासलेला देश जगातला सर्वाधिक सुखी देश ठरला आहे. याच पध्दतीने जगातील सर्वात शांत देश अधूनमधून मोजले जातात. किंबहुना त्यासाठी सार्‍या जगाची पाहणी केली जाते आणि जागतिक शांततेचा निर्देशांक काढला जातो. २०१२ साली सीरियातील संघर्ष सुरू झाला आणि सगळा पश्‍चिम आशिया तसेच उत्तर आफ्रिका अशांतीने वेढला गेला. त्याचा उपद्रव यूरोप खंडालासुध्दा झाला. तेव्हापासून जगामध्ये शांततेचे मोजमाप केले जात आहे.

२०१७ सालचा जागतिक शांततेचा निर्देशांक थोडा चांगला निघाला आहे. २०१२ सालपेक्षा आता सध्याचे जग ०.२८ टक्के एवढे अधिक शांत आहे. असे ही पाहणी करणार्‍या संघटनेला आढळले आहे. त्यांनी यासाठी १६१ देशांची पाहणी केली. तेव्हा त्यांना असे दिसून आले की २०१२ नंतर ९३ देशांची स्थिती सुधारली आहे तर ६८ देशांची स्थिती खालावलेली आहे. आईसलँड हा जगातला सर्वाधिक शांत देश ठरला आहे. विशेष म्हणजे आईसलँडने २००८ साली पहिल्यांदा हा मान मिळवला होता. तो आजपर्यंत कायम टिकवला आहे. आईसलँडच्या पाठोपाठ न्यूझीलंड, पोर्तुगाल, ऑस्ट्रीया, डेन्मार्क या देशांनीसुध्दा शांततेच्या निर्देशांकात वरचे स्थान पटकावले आहे. अर्थातच सीरिया हा देश या निर्देशांकाच्या यादीत सर्वात खाली आहे.

अफगाणिस्तान, इराक, दक्षिण सुडान आणि येमेन हे देश सीरियाच्या पाठोपाठ अशांत देश म्हणून नोंदले गेले आहेत. या पाहणीमध्ये सार्‍या जगाची पाहणी झाली नसली तरी अधिक लोकसंख्येचे बहुतेक देश पाहून झालेले आहेत आणि जगाची ९९.७ टक्के लोकसंख्या पाहणीच्या कक्षेत आली आहे. या पाहणीमध्ये भारताचा क्रमांक कोठे आहे? तो तसा अशांत देशांच्या यादीतच आहे. परंतु २०१२ पेक्षा भारताची स्थिती सुधारल्याचे या पाहणीत आढळले आहे. २०११ साली भारतात सर्वाधिक अशांतता होती. नंतर ही स्थिती सुधारत आली असल्याचे या पाहणीचे निष्कर्ष आहेत. आज जरी भारतासमोर काश्मीरचा प्रश्‍न असला तरी सध्याची अवस्था २०११ पेक्षा चांगली आहे. असे या पाहणी करणार्‍यांना वाटते. भारताचा क्रमांक या यादीत १३७ वा आहे.

Leave a Comment