न्यायाघरी अंधार नाही


नवी दिल्लीतल्या एका बलात्काराच्या खटल्यात दिल्लीच्या न्यायालयात एका वेगळा पण स्तुत्य निकाल देण्यात आल्याने एका निराधार, अनाथ मुलीला न्याय मिळाला. आई आणि वडील अशा दोघांचाही आधार नसलेल्या १० वर्षांच्या बालिकेवर तिच्या मावशीच्या नवर्‍याने अत्याचार केला. केवळ १० वर्षांची ही मुलगी या लैंगिक शोषणाचा प्रतिकार कसा करावा हे न समजून घरातून पळून गेली. एका मोडक्या बसमध्ये जाऊन लपून बसली. ती सामाजिक कार्यकर्त्यांना सापडली पण ती मुलगी या कार्यकर्त्यांना आपल्यावर कोसळलेली आपत्ती नेमकी काय आहे हे सांगूही शकत नव्हती. तिच्याकडून कशीबशी आणि अर्धवट माहिती मिळाली तिच्यावरून पोलिसांत तक्रार करण्यात आली.

ज्या मावशीने आधार दिला तिच्याच पतीने अत्याचार केल्यावर त्याचा पुरावा तरी कसा देणार ? अत्याचार करणार्‍या नराधमाने तर कसलाही अत्याचार झालेला नाही असा पवित्रा घेऊन चक्क हात वर केले. न्यायाच्या प्रचलित भाषेत सांगायचे तर पुरावा नसल्याने आरोपी निर्दोष सुटणार. पण न्यायाधीशांना हे मान्य होईना. दहा वर्षांची एक मुलगी आपल्या मावशीचे घर सोडून उगाच पळून जाणार नाही आणि अशी मोडक्या बसमध्ये विनाकारण आधार घेणार नाही. तेव्हा काही तरी विपरीत घडलेले आहेच अशी न्यायाधीशांना खात्री वाटत होती.

मुलगी मुळात बंगालमधली असल्याने भाषेच्याही अनेक अडचणी होत्या. पण चित्राला भाषेचा अडसर नसतो. म्हणून न्यायाधीशांनी त्या मुलीला काही कागद आणि रंगीत खडू देण्यात आले. तिला चित्र काढायला लावले. तिने हातात फुगे घेतलेली एक मुलगी काढली पण तिच्या पायाशी तिचे कपडे अस्ताव्यस्तपणे पडले असल्याचे दाखवले. न्यायाधीशांनी या चित्रात तिच्या भावना प्रकट झाल्या आहेत असा निष्कर्ष काढला. एवढेच नाही तर त्यावरून गुन्हा सिद्ध होतो अशी भूमिका घेऊन त्या नराधमाला पाच वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी सजा फर्मावली. मुलीचा अजाणपणा, अगतिकता आणि भाषेची अडचण यातून मार्ग काढत न्यायाधीशांंनी चांगला न्याय दिला. त्या मुलीचे पलायन आणि तिची अवस्था हा तर मोठाच पुरावा होता. आता ही मुलगी सुधारगृहात रहात असून ती सावरली आहे. ती आता शाळेत जाते आणि मन लावून अभ्यासही करते. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांचीही भूमिका कौतुकास्पद ठरली.

Leave a Comment