स्वत:लाच कंपनी द्या


जपानमध्ये वृद्धांचे प्रश्‍न फार गंभीर झाले आहेत. कारण तिथल्या राहणीमानातल्या वाढीमुळे लोकांचे सरासरी आयुष्यमान वाढून समाजातल्या वृद्धांची संख्या फार झाली आहे. जपानची सरासरी आयुर्मर्यादा ८१ वर्षे आहे आणि साठी पार पडलेल्या वृद्धांचे तिथल्या लोकसंख्येतले प्रमाण ३४ टक्क्यांवर गेले आहे. लोकसंख्येचा एवढा मोठा हिस्सा काहीही काम न करता केवळ निवृत्ती वेतनावर जगत असेल तर सरकारला ते मोठेच आर्थिक ओझे वाटत असते. ही तर सरकारची समस्या झाली पण वृद्धांच्याही अनेक समस्या आहेत. कसलेही ध्येय समोर नसताना त्यांना एवढे प्रदीर्घ आयुष्य जगावे लागते. तिथे अनेकांना हे आयुष्य नको झाले आहे. म्हणून त्यातल्या काही वृद्धांनी इच्छा मरणाचा कायदा करण्याची मागणी केली आहे.

यालाही कारणे आहेत. हे सारे वयस्कर लोक एकाकी आयुष्य कंठत आहेत. मुले बाळे जवळ नाहीत. नातवंडे खेळायला नाहीत. सारा वेळ एकाकीपणात घालवावा लागतो. साधे जेवळ करायचे म्हटले तरीही पंचाईत. एकट्याने जेवायला सुरूवात केली तर घशाखाली घास उतरत नाही. कारण जेवतानाही कंपनी हवी असते. लहान मुलेही अंगत पंगत करतात. तेव्हा जेवणाचा आनंदही घेतात आणि चार घास जास्त खातात. कधी कधी आपण जेवत असतो आणि आपल्या समोर कोणीतरी केवळ उपस्थित राहिला तरीही त्याच्याशी गप्पा मारत जेवण्याने जेवणाची रंगत वाढते. जपानमधील वृद्धांकडे पैसा आहे पण एकाकीपणामुळे ते अशा रंगतदार जेवणाच्या आनंदालाही मुकले आहेत.

हा आनंद वाढवायला काही पैसा लागत नाही. तेव्हा तो कसा वाढवता येईल यावर संशोधन सुरू आहे. टीव्ही समोर बसून जेवण केले की जेवणातला एकाकीपणा कमी होतो पण टीव्ही मधील कलाकारांशी गप्पा मारता येत नाहीत. तिथल्या मानसशास्त्रज्ञांनी त्यावर एक छान तोडगा काढला आहे. ज्याला एकटेच जेवण करण्याचा कंटाळा आला असेल त्याने आरशासमोर बसून जेवण करावे. जेवताना आपल्याला आरशात आपलीच जेवतानाची प्रतिमा दिसेल आणि आपल्या सोबत कोणीतरी आहे असा दिलासा मिळून जेवण गोड लागेल. हा तोडगा कामाला येत आहे. आरशासमोर जेवणारांना जेवणाचा आनंद मिळत आहे. हा उपाय केवळ वृद्धांसाठी नाही. कोणत्याही वयोगटातल्या लोकांना आरशासमोर बसून जेवल्याने चार घास अधिक जातात असे आढळून आले आहे.

Leave a Comment