इस्रोचे भीमकाय काम


इस्रोने सार्‍या जगाला चकित करणारी कामगिरी काल पार पाडली. आजपर्यंत इस्रोने एकाच वेळी शंभरांपेक्षा अधिक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याचा विक्रम नोंदलेला होता पण आता सर्वाधिक वजनाचा उपग्रह सर्वाधिक वजनाच्या रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात पाठवण्याची भीमकाय कामगिरी पार पाडली आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेले जीएसएलव्ही एमके ३ डी १ हे रॉकेट विकसित करण्यात आले होते. ६४० टन वजनाचे हे रॉकेट साधारणपणे २०० हत्तींच्या वजनाएवढे आहे. शिवाय ते १२ मीटर उंच आहे. अशा प्रकारे विकसित करण्यात आलेले हे रॉकेट काल इस्रोच्या अंतराळ तळावर ३१३६ किलो वजनाचा उपग्रह घेऊन अवकाशात गेले. या मोहिमेतून केवळ हेच दोन विक्रम केले गेले आहेत असे नाही तर हा उपग्रहही अनेक बाबतीत विक्रमी आहे.

अवकाश संशोधनात भारताने नेमक्या कोणत्या क्षेत्रातील काम उल्लेखनीय केले आहे याचा शोध घेतला असता असे लक्षात येते की भारताने दळणवळणाच्या क्षेत्रावर अधिक भर दिलेला आहे. काल पाठवण्यात आलेला जी सॅट १९ हा उपग्रहही असाच बहुद्देशीय आहे. सध्या अवकाशात भारताचे ४१ उपग्रह आहेत. त्यातील २३ उपग्रह हे दळणवळणाशी संबंधित आहेत. त्यातल्या ९ उपग्रहांची कामगिरी करण्याची क्षमता जी सॅट १९ मध्ये आहे. या उपग्रहाच्या निर्मितीसाठी १६० कोटी रुपये खर्च आलेला आहे. तो मल्टिवेव्ह या प्रकारातला असून त्याच्यामुळे भारतातली इंटरनेट सेवा अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे. रॉकेटसाठी आलेला ३०० कोटी रुपयांचा खर्च आणि उपग्रहासाठी आलेला १६० कोटी रुपयांचा खर्च हा भारताच्या उत्पन्नात मोठी भर घालणारा ठरणार आहे.

या उड्डाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा अजस्र उपग्रह आणि रॉकेट हवेत सोडण्यासाठी ज्या इंजिनाचा वापर केला आहे ते इंजिनसुध्दा वैशिष्ट्यपूर्ण आहे. २ बूस्टर्सच्या साह्याने हा रॉकेट आणि उपग्रह वातावरणाच्या स्तरापर्यंत नेले जातील आणि त्या स्तराच्या बाहेर त्याला योग्य ठिकाणी स्थापित करण्याचे काम क्रायोजनिक इंजिनाच्या साह्याने केले जाईल. हे क्रायोजनिक इंजिन भारतीय बनावटीचे आहे. पूर्वी अशा प्रकारचे इंजिन आपल्याला अमेरिका किंवा रशियाकडून विकत घ्यावे लागत होते. परंतु हे दोन्ही देश याबाबतीत भारताची नेहमीच अडवणूक करत असत आणि त्यामुळे आपल्या अंतराळ संशोधनात अडथळे येत असत आता मात्र ते इंजिन आपण स्वतःच तयार करत आहोत.

Leave a Comment