वरांचे अपहरण


बिहारमध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातली गुंडगिरी कमी झाली आहे. अन्यथा लालू राज मध्ये तिचे प्रमाण फारच होते. तिच्यात लोकांचे अपहरण करून त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मोठी खंडणी वसूल करण्याचे प्रकार फार होते. अशा अपहरणाचे प्रमाण फार कमी झाले आहे. मात्र बिहारच्या सामाजिक जीवनाचे भेदक दर्शन घडवणार्‍या अपहरणाच्या एका प्रकाराला नितीशकुमार आळा घालू शकलेले नाहीत. तो प्रकार आहे उपवर वरांचे अपहरण. आपण लग्नासाठी मुली पळवून नेण्याचे प्रकार ऐकून आहोत पण लग्नासाठी मुलांचेही अपहरण होत असते हे ऐकून आपल्याला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. बिहारात असे प्रकार नित्य घडत असतात.

तिथले वधुपिते आपल्या जावयाची निवड करतात आणि कोणाला तरी सुपारी देऊन त्या जावयाला पळवून आणतात. त्याला अज्ञात ठिकाणी नेऊन त्याचा विवाह आपल्या मुलीशी लावून देतात. तिथे अजूनही अल्पवयात विवाह होतात. तेव्हा अशा लग्नातली मुलगी असते १२ ते १५ वर्षे वयोगटातली तर पळवून आणलेली मुले असतात १६ ते १८ या वयातली. काही मुलांना तर दहावीची परीक्षा झाल्याबरोबर शेवटच्या पेपरच्या दिवशी पळवून आणतात. कारण तो त्यांच्या भाषेत बहुत पढा लिखा दामात असतो. त्याच्याशी मुलीशी विवाह लावावा तर तो बराच शिकलेला असल्यामुळे त्याच्या हुंड्याचा दर लाखांत गेलेला असतो. मग त्याला पळवून आणून जबरदस्तीने विवाह लावला की हुंडा देण्याच्या संकटातून सुटका होते.

अशा विवाहासाठी मुलांना पळवण्याचे प्रकार तिथे सर्रास होतात. एकदा काही तरी करून विवाह झाला की मग वर पित्याने कितीही आरडा ओरडा केला तरीही त्यांना कोणी दाद देत नाही. मग वराचे पालकही पोलिसात वगैरे जाण्याच्या भानडीत पडत नाहीत. या उपरही ज्या अपवादात्मक प्रकारात पोलिसांत नोंद झाली आहे त्या प्रकारांची २०१६ सालातली संख्या ३ हजार पाचशे एवढी आहे. तेवढीच अधिकृत धरली तरी तिथे मुलांना पळवून नेऊन जबरदस्तीने विवाह लावण्याचे दररोज १० प्रकार घडतात. एखादा वरपिता वेळीच सावध होऊन पोलिसांत जातो आणि पोलिसांना विवाहाच्या मांडवातच हजर करतो पण पोलीस काहीच करीत नाहीत. हा त्यांचा आपापसातला मामला आहे असे म्हणून पोलीस दुर्लक्ष करतात. पोलिसांनीच अशी उदासीनता दाखवल्यावर वरपिताही काही हालचाल करीत नाही. नशिबाला बोल लावून गप्प बसतो.

Leave a Comment