हा तर जीवन मरणाचा प्रश्‍न


आपण प्रगती करीत आहोत आणि लोकांचे राहणीमान वाढवत आहोत पण या विकासाची काय किंमत आपल्याला चुकवावी लागत आहे याची आपल्याला जाणीव नाही. आपण एका हाताने विकास करीत आहोत आणि दुसर्‍या हाताने विकासासाठी पर्यावरणाची हानी करून आपल्याच हाताने आपण मरण ओढवून घेत आहोत. मानव प्राण्याची ही शोकांतिका आता उजागर होत असून मानवाने अशीच आततायी धोरणे राबवली आणि आपल्या विकासासाठी निसर्गाला ओरबडण्याचे सत्र जारी ठेवले तर एक ना एक दिवस ही मानवी जात नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. याची जाणीव मानवाला व्हावी यासाठी आज पर्यावरण दिन पाळला जात आहे. पर्यावरणाचा नाश होण्याच्या मुळाशी आधी तर मानवाची लोकसंख्या आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, या भूमातेजवळ जी साधन संपत्ती आहे ती केवळ १५० कोटी लोकसंख्येला पुरेल एवढीच आहे पण तिच्यावर आता ८०० कोटी लोकांची गुजराण करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. परिणामी नैसर्गिक साधनांचा वाढता वापर सुरू झाला असून प्रदूषणाचे संकट गहिरे झाले आहे.

याही वापरात काही विसंगती आहेत. ही वाढती लोकसंख्या जगाच्या पाठीवरील सगळ्या देशांत समान नाही. काही देशांत ती कमालीची विरळ आहे तर काही देशात ती कमालीची दाट आहे. म्हणजे विरळ लोकसंख्येच्या देशांना निसर्गाच्या साधन संपत्तीचा विनियोग मुक्तपणे करायला मिळत आहे तर आजच्या ८०० कोटी लोकसंख्येपैकी ६०० कोटी लोक अशा देशांत रहात आहेत की मानवी लोकसंख्येच्या ८० टक्क्यांनी असलेल्या या देशांना जगातल्या साधनांपैकी जेमतेम ४० टक्केही साधनांचा लाभ घेता येत नाही. म्हणजे निसर्गाचा उपभोग जगातले मुठभर देश म्हणजेच विकसित देशच घेत आहेत. एवढ्यावरही ही विसंगती थांबत नाही. या संपन्न देशांची लोकसंख्या कमी होत आहे आणि आधीच गांजलेल्या देशांची लोकसंख्या बेसुमार वाढत आहे. जगाची केवळ लोकसंख्याच वाढली आहे असे नाही तर त्यांच्या वाढत्या राहणीमानाने त्यांच्या गरजाही वाढल्या आहेत. त्यामुळे उपभोगाची सांख्यिकी आणि दर्जात्मक अशी दुहेरी वाढ होऊन निसर्गाला ओरबाडण्याचे प्रमाण किती तरी पटीने वाढले आहे. दुसर्‍या बाजूला तेवढेच खड्डे पडले आहेत. लोकसंख्या आणि तिला मिळणारे निसर्गाचे सुख यांच्यात ही सारी विसंगती निर्माण होण्यामागचे सर्वात मोठे वैचारिक कारण हे पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या समजुतीत दडलेले आहे.

अमेरिका आणि यूरोपातील देशांनी निसर्गाचा विचारच चुकीच्या दिशेेने केलेला आहे. ते निसर्गाला आपला शत्रू मानतात आणि आपल्या सुखासाठी निसर्गावर मात केली पाहिजे असा त्यांचा समज आहे. निसर्ग आपला सोबती नाहीतर तो आपला स्पर्धक आहे आणि त्यात जे काही आहे ते आपल्या उपभोगासाठी निर्माण झाले असा त्यांचा समज आहे. या विचारसरणीमुळे त्यांनी सातत्याने आपल्या उपभोगासाठी निसर्गाला ओरबाडले आहे. परिणामी निसर्गातली जंगले नष्ट झाली आणि सिमेंटची जंगले उभे राहिली. नैसर्गिक जंगले हवेला थंड ठेवीत होती तर सिमेंटची जंगले हवेतला उष्मा वाढवतात. हा उष्मा असह्य झाला की माणसे घरे थंड ठेवायला लागतात आणि ती चांगली थंड व्हावीत यासाठी वीजेवर चालणारी यंत्रे वापरायला लागतात. त्यासाठी वीज तयार करावी लागते आणि ती तयार होताना पर्यावरणाचा बराच नाश होतो. एकंदरित पर्यावरणाच्या नाशाची ही मालिका अव्याहत सुरू रहाते. मानवाने निसर्गाशी कायमचा दावा मांडलेला आहे. माणूस म्हणजे निसर्गाशी वैर करून स्वत:च्या पायावर धोंेडा पाडून घेणारा प्राणी ठरला आहे. ही स्थिती इतकी टोकाची आत्मघातकी ठरली आहे की, मानवाच्या अस्तित्वालाच आव्हान निर्माण झाले आहे.

काही शास्त्रज्ञांनी मानवाच्या निसर्गाशी संघर्ष करण्याच्या वेगाचा असा काही लेखाजोखा मांडला आहे की, येत्या पाच हजार वर्षात या मानवी प्राण्याला अनेक रोगांचा त्रास सहन करावा लागेल आणि ही मानवी जात या पृथ्वीवरून नष्ट होईल. हे संकट टाळण्यासाठी आपल्याला येत्या १०० वर्षात अन्य एखाद्या ग्रहावर स्थलांतर तरी करावे लागेल किंवा निसर्गाला धक्का न लावता जगायला शिकले पाहिजेे. अर्थात मानव हा एवढा संकुचित झाला आहे की, तो पाच हजार वर्षांनंतरच्या या संकटाचा विचार करायलाच तयार नाही. आता त्याला आपल्या सुखाच्या कल्पनांनी झपाटले आहे. मानवी जात पाच हजार वर्षांनी नाहीशी होणार असतील तर तेव्हा या पृथ्वीवर नांदणार्‍या आपल्या पुढच्या पिढ्या त्याचा काय तो विचार करतील. आता आपण कशाला काळजी करायची असा तो विचार करीत असेल पण असा विचार करणेही चुकीचे आहे. कारण ही जात पाच हजार वर्षांनी नष्ट होणार असेल तर त्या दृष्टीने प्रत्येक १०० वर्षाला एकेक पाऊल पडणार आहे. तशी पावले आताच पडताना दिसत आहेत. तेव्हा नष्ट होण्याचे संंकट हे काही पाच हजार वर्षांनी एकदम येणार नाही. त्याची चिन्हे आताच दिसत आहेत. म्हणून मानवाने आजच सावध होण्याची गरज आहे. निसर्गाशी मैत्री करीत प्रगती करण्याची गरज आहे.

Leave a Comment