गुणी परदेशस्थ भारतीय


जगातले सर्वात श्रीमंत राष्ट्र म्हणवणार्‍या अमेरिकेची लोकसंख्या ३२ कोटी असून त्यात जवळपास ३० लाख भारतीय आहेत. यातला कोणीतरी अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकेल का असा विचार कधी कधी डोक्यात येतो. मात्र ते अगदीच अशक्य आहे असे समजण्याचे कारण नाही. कारण गेल्या २० वर्षात अमेरिकेत अनेक भारतीय लोक उच्च पदावर निवडले जायला लागले आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांच्या मंडळात काही भारतीयांचा समावेश झालेला आहे. अशा बातम्या आपण वाचतो. एक दोघे भारतीय तर तिथे गव्हर्नर म्हणून निवडूनही आलेले आहेत. ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर तर भारतीयांचा असा प्रभाव जास्तच तीव्रतेने जाणवला. एकंदरीत भारतीय लोक गरजू म्हणून परदेशात गेले असले तरी आता ते तिथे समाजाचे नेतृत्वसुध्दा करायला लागले आहेत.

यापूर्वी भारतातल्या काही लोकांनी अमेरिकेत नसले तरी अन्य काही देशांमध्ये चांगलेच बस्तान बसवून तिथे पंतप्रधानपदसुध्दा हस्तगत केलेले आहे. मॉरिशसमध्ये तर अनिरुध्द जगन्नाथ आणि शीलाबाय बापू या दोघांनी पंतप्रधानपदाचा मान मिळवलेला आहे. फिजी या देशातही महेंद्रसिंग चौधरी यांनी अध्यक्षपदाचा मान मिळवला आहे. हीच परंपरा पुढे चालू ठेवत लिवो वराडकर या मूळ भारतीयाने आयर्लंडमध्ये पंतप्रधान होण्याचा मान मिळवला आहे. वराडकर यांचे घराणे मुळातले कोकणातले सिंधूदुर्ग जिल्ह्यातले आहे. लिवो वराडकर यांचे वडील स्थलांतर करून आयर्लंडमध्ये गेले आणि तिथे वैद्यकीय व्यवसाय करता करता स्थायिक झाले. त्यांचे चिरंजीव आता त्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत.

लिवो वराडकर यांचे वय अवघे ३८ वर्षे आहे आणि ते आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधानही ठरलेले आहेत. आयर्लंडच्या इतिहासामध्ये वराडकर यांच्यामुळे आणखी एक विक्रम नोंदला गेला आहे. ते आयर्लंडचे असे पहिले पंतप्रधान ठरले आहेत ज्यांनी समलिंगी विवाह केला आहे. एवढेच नव्हे तर अशा लोकांच्या राजकीय पक्षाचे ते नेते आहेत. आपण समलिंगी असल्याचे त्यांनी गेल्या काही महिन्यापूर्वीच जाहीर केलेले आहे. आयर्लंडचे लोक आपल्यापेक्षा सुधारलेले असल्यामुळे ते समलिंगी संबंध ठेवणार्‍याला समाजातून बहिष्कृत करत नाहीत. वराडकर यांचेही हे वर्तन तिथल्या जनतेने स्वीकारलेले आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी वराडकर हे २००७ साली तिथल्या संसदेवर निवडून आले होते आणि त्यांनी विविध खात्यांचे मंत्री म्हणून कामही केलेले आहे.

Leave a Comment