तेलंगणाचा विकास


तीन वर्षांपूर्वी तेलंगण हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्रात स्वतंत्र विदर्भाची मागणी सुरूच आहे. अशा प्रकारे राज्यांचे विभाजन करून त्यातून छोटी राज्ये निर्माण करणे हे कितपत सयुक्तिक आहे यावर कोणतेही नवीन राज्य निर्माण झाल्यावर चर्चा होत असते. छोट्या राज्यांचे समर्थक असणार्‍या लोकांनी वारंवार असा दावा केलेला आहे की छोटी राज्ये व्यवस्थापनाला सोपी जात असल्यामुळे त्यांचा विकास झपाट्याने होऊ शकतो. यापूर्वी निर्माण झालेल्या उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड या तीन राज्यांनी वेगळे झाल्यापासून पूर्वीपेक्षा अधिक गतीने विकास केलेला आहे. त्यातल्या त्यात उत्तराखंडचा विकास चांगलाच झालेला आहे. त्यानंतर तेलंगणाच्या निर्मितीनंतर त्याच्या विकासाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते.

तेलंगणाचे मोठे समर्थक असलेले या राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नेहमीच तेलंगण स्वतंत्र झाल्यास तेलंगणाचा झपाट्याने विकास होईल असा दावाही केलेला आहे. त्यांनी राज्याचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर आपला दावा खरा करून दाखवला आहे आणि तेलंगणाने गेल्या तीन वर्षांत दहा टक्क्यांपासून १७ टक्क्यांपर्यंतचा विकास वेग नोंदला आहे. देशाचा विकास जेमतेम सात टक्क्यांनी होत असताना केवळ तेलंगणाचा वेगळा विकास वेग मोजला तर तो १७ टक्क्यांपर्यंत जावा हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे. तेलंगणात बेकारांचे प्रमाणही देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे.

भारतामध्ये नोंद झालेल्या बेकारांचे प्रमाण लोकसंख्येच्या ३.७ टक्के एवढे आहे. पण तेलंगणात मात्र तेच प्रमाण केवळ २.७ टक्के म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या एक टक्क्याने कमी आहे. तेलंगणाने देशाच्या संपत्तीत घातलेली भर हीसुध्दा त्याच्याकडून असलेल्या अपेक्षापेक्षा जास्त आहे. देशाच्या लोकसंख्येत तेलंगणाचे प्रमाण जेवढे आहे त्यापेक्षा अधिक भर या राज्याने राष्ट्रीय संपत्तीत टाकलेली आहे. आपल्या देशातल्या एकूण विकासावर नेहमीच पावसाचा परिणाम होत असतो. गेल्या वर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे या आघाडीवर तेलंगणाला मोठा दिलासा मिळाला आणि त्यामुळे तेलंगणाला चांगला विकास वेग साधता आला. मात्र त्याचबरोबर तेलंगण सरकारने उद्योगाच्या विकासाला गती देणारी पावले अतीशय वेगाने टाकली आहेत. शेतीमध्ये झालेल्या चांगल्या उत्पन्नामुळेच तेलंगणाला ही गोष्ट साध्य झालेली आहे यावर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भर दिलेला आहे.

Leave a Comment