एस. टी. ची सत्तरी


महाराष्ट्राच्या लाडक्या एस. टी. ला ६९ वर्षे पूर्ण झाली असून तिने सत्तराव्या वर्षात पदार्पण केले आहे. एस. टी. महामंडळ हे प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी सुरू झाले आणि नंतर हळूहळू उत्पन्न वाढीचे साधन म्हणून या महामंडळाने मालाची वाहतूकही करण्यास सुरूवात केली. परंतु या महामंडळाला आणि एस. टी. च्या गाडीला प्रवाशांची आणि मालाची वाहतूक करणारे एक साधन एवढेच स्वरूप राहिले. ती महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आणि संस्कृतीतही एक वेगळे स्थान मिळवून बसली. १९४८ साली ३५ बसगाड्यांच्या साह्याने सुरू झालेले हे महामंडळ सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात खासगी सर्व्हिस गाड्या प्रवासी वाहतुकीची सोय करत असत. अगदी खासगी स्वरूपाची ही वाहतूक पूर्णपणे मनमानी पध्दतीने चालवली जात होती. गाडी कधी सोडायची आणि ती गंतव्य स्थानी कधी पोहोचवायची याला कसलेही वेळापत्रक नव्हते. या दोन्ही वेळा सर्व्हिसचे मालक, चालक आणि वाहक या तिघांच्या सोयीने आणि मर्जीने ठरत असत. त्यामुळे २५ ते ३० किलोमीटर एवढ्या अंतराचा प्रवास करायचा झाला तरी सारा दिवस वाया जात असे.

एस. टी. महामंडळ सुरू झाल्यापासून हे चित्र बदलून गेले आणि प्रवास करणार्‍या लोकांच्या जीवनाला एक शिस्त आली. गाडी सोडण्याची आणि ती गंतव्य स्थानी पोहोचण्याची काही एक ठराविक वेळ असते ही कल्पना महाराष्ट्राच्या जीवनात पहिल्यांदाच साकार झाली. लोक एस. टी.ने प्रवास करताना घड्याळाकडे बघायला लागले. कदाचित लोकांना हा मानसिक परिणाम फार तीव्रतेने जाणवणार नाही परंतु मराठी माणूस सुशिक्षितासारखा वागायला लागला, वेळेवर कामे करायला शिकला याचे बरेचसे श्रेय एस. टी. महामंडळाला आहे. एस. टी. ने जसा वक्तशीरपणा शिकवला तसाच वेळेचा सुदुपयोग करण्याचे कौशल्यही शिकवले. कारण १९७४ साली एस. टी. महामंडळाची रातराणी सेवा सुरू झाली. त्यामुळे रात्रीचा वेळ कारणी लावायला लागले. एखाद्या गावाला कामाच्या निमित्ताने जायचे असेल तर पूर्वी जाण्यास एक दिवस, कामाचा एक दिवस आणि परतण्याचा एक दिवस असे तीन दिवस लागत असत. परंतु रातराणी सेवेमुळे रात्री प्रवास करून हेच काम एका दिवसात केले जायला लागले. अशा प्रकारे एस. टी. महामंडळाच्या रातराणीने मराठी माणसाला बिझी केले. त्याचे कामाचे दिवस वाचले आणि तो कमी वेळात अधिक कामे करायला शिकला. गेल्या ४० वर्षात सावकाशीने घडलेले हे परिवर्तन आहे.

एस. टी. महामंडळाचा सत्तरावा वाढदिवस साजरा होत असताना त्याच्या तोट्याची चर्चा फार होत आहे. परंतु पैशाच्या भाषेत हा तोटा काही प्रमाणात होत असला तरी एस. टी. महामंडळाचे महाराष्ट्राला झालेले असे मानसिक फायदे फार मोठे आहेत. जे पैशात मोजता येणार नाहीत. सध्या एस. टी. महामंडळाचा ६९ वा वाढदिवस साजरा होत असतानाच महामंडळाच्या ताफ्यात साडे अठरा हजार वाहने आहेत आणि १ लक्ष कर्मचारी आहेत. एस. टी. च्या विविध गाड्यांमधून दररोज प्रवास करणार्‍यांची संख्या ६६ लाख ७८ हजार एवढी सरासरीने आहे आणि एस. टी. चे प्रतिदिन उत्पन्न १९ कोटी २६ लाख रुपये आहे. ७० वर्षांची वाटचाल विचारात घेतली असता आणि महामंडळाला मिळणारा सरकारचा पाठींबा विचारात घेता महामंडळाची ही वाढ फार समाधानकारक आहे असे म्हणता येत नाही. कारण महाराष्ट्राची गरज यापेक्षा मोठी आहे. अर्थात, एस. टी. महामंडळाला अपेक्षेएवढी प्रगती करण्यात बरेच अडथळे आहेत आणि या अडथळ्यांची ही चर्चा आज झाली पाहिजे. कारण महामंडळाला खासगी वाहतुकीशी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा करावी लागत आहे.

एस. टी. महामंडळाला सरकारची मदत मिळाली पाहिजे कारण हा सरकारचा अंगिकृत व्यवसाय आहे. भारतामध्ये खुल्या अर्थव्यवस्थेचे आणि खासगीकरणाचे युग अवतरले तेव्हा एस. टी. महामंडळ बरखास्त करून त्याचेही खासगीकरण करावे अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. महाराष्ट्रात एकंदरीत खासगीकरणाचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु त्यांच्यासह सर्वांनी एस. टी. महामंडळाच्या खासगीकरणाला कसून विरोध केला. महामंडळ तोट्यात असले तरी आणि त्यात सरकारचा काही पैसा गुंतलेला असला तरी महामंडळ हे महामंडळ म्हणूनच चालवावे असा आग्रह सर्वांनीच धरला. कारण महामंडळ बरखास्त झाले तर महाराष्ट्रातील जनतेच्या प्रवासाची सारी जबाबदारी खासगी वाहतुकीवर पडेल आणि जनतेचे मोठे हाल होतील हे सर्वांच्याच लक्षात आले. एस. टी. महामंडळाचे आपल्या जीवनातले स्थान एवढे जिव्हाळ्याचे झाले आहे की त्याच्या खासगीकरणाची कल्पनाच लोकांना सहन होत नाही. अशी ही महाराष्ट्रातल्या जनतेची लाडकी एस. टी. ७० वर्षांची झाली असली तरी ती म्हातारी होऊ नये. सत्तराव्या वर्षी तिने नवजीवन प्राप्त करून महाराष्ट्रातील जनतेची सेवा अधिक कार्यक्षमतेने करावी. या कामी महाराष्ट्र शासन आणि मराठी जनता या सर्वांनीच आपला सक्रीय सहभाग नोंदवावा अशी सदिच्छा व्यक्त करावीशी वाटते.

Leave a Comment