लंडन मराठी संमेलन


मराठी माणूस हा समारंभप्रिय आहे. त्यामुळेच साहित्य संमेलन भरवणारा एकमेव भाषक गट असा मान त्याने मिळवलेला आहे. आता हिंदी, गुजराती, कन्नड या भाषांची साहित्य संमेलने भरवली जात आहेत परंतु साहित्य संमेलन भरवून ते जवळपास १०० वर्षे सलग चालू ठेवणे हा पराक्रम मराठी माणसानेच केलेला आहे. हा मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी आपला स्वभाव सोडत नाही. म्हणूनच लंडनमध्ये आजपासून तेथील महाराष्ट्र मंडळातर्फे लंडन मराठी साहित्य संमेलन भरवले जात आहे. महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेला ८५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे तीन दिवसांचे संमेलन भरवले जात आहे. मराठी माणूस लंडनमध्ये गेला तरी तिथे होणारे हे साहित्य संमेलन पूर्णपणे मराठी थाटात साजरे होणार आहे. त्याला अनेक मंत्री, सेनाधिकारी आणि उद्योजक यांची उपस्थिती लाभणार आहे.

या संमेलनाचे प्रायोजकत्व भारत विकास समूह या उद्योग समूहाचे प्रवर्तक हणमंत गायकवाड यांनी स्वीकारलेले आहे. साधारणतः महाराष्ट्रात होणार्‍या साहित्य संमेलनांचे प्रायोजकत्व अशा उद्योजकांनीच स्वीकारलेले असते. परंतु लंडनच्या मराठी साहित्य संमेलनाचे प्रायोजकत्व हणमंत गायकवाड यांनी स्वीकारले आहे याला एक विशेष महत्व आहे. कारण हणमंत गायकवाड ही महाराष्ट्रातली एक अशी सक्सेस स्टोरी आहे की जिच्यामुळे जगातल्या कोणत्याही नव्या उद्योजकाला प्रेरणा मिळावी. भारत विकास समूह हा काही फार जुना उद्योग समूह नाही. त्याची वाटचाल फार तर अलीकडच्या २५ वर्षातली आहे.

हणमंत गायकवाड हे सातारा जिल्ह्यातल्या एका खेड्यातले. गावातले पहिले इंजिनिअर असा मान मिळवल्यामुळे गावाने त्यांचा सत्कार केला. पण सत्कार समारंभात सर्वांनीच गायकवाड यांना गावातल्या सुशिक्षित बेकार मुलांसाठी काहीतरी करण्याचे आवाहन केले. तिथेच गायकवाड यांच्या मनात भारत विकास समूह या उद्योग समूहाचे बीज रोवले गेले. गावातली २० मुले सोबत घेऊन त्यांनी समूहाची सुरूवात केली. आज या विकास समूहात ६५ हजार लोक काम करत आहेत. या गायकवाड यांनीच साहित्य संमेलनाचे प्रायोजकत्व स्वीकारल्यामुळे या संमेलनात उद्योजकतेला महत्त्व दिले जाणार आहे. काही उद्योजकांचे सत्कार केले जाणार आहेत. मराठी माणूस उद्योगात मागे असतो. मराठी भाषकांमध्ये नोकरीची परंपरा आहे. उद्योगाची नाही. तेव्हा या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी माणसाच्या मनातल्या उद्योजकीय प्रेरणा जागा झाल्या तर हे एक वेगळ्याच प्रकारचे साहित्य संमेलन ठरणार आहे.

Leave a Comment