‘वारांगणां’च्या मुलांसाठी तृतीयपंथी गौरी सावंत बांधत आहे स्वप्नांचे घर


पुणे – ‘विक्स’ची साधारण दोन महिन्यांपूर्वी आलेली #TouchOfCare जाहिरात तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या काही सेकंदाच्या जाहिरातीतून तृतीयपंथी गौरी सावंत आणि तिने दत्तक घेतलेल्या मुलीची कथा मांडली होती. या जाहिरातीतील गौरीला आपण आजही विसरलो नाही. एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन तिच्या भविष्यासाठी धडपडणारी गौरी एवढीच ओळख आपल्याला आतापर्यंत माहिती होती. पण यापेक्षाही गौरी खूप वेगळी आहे. तिला समाजाने पावलोपावली नाकारले. अपमानास्पद वागणूक दिली तेव्हा समाजात नेहमीच उपेक्षित असलेल्यांचे दु:ख किती बोचरे असते हे गौरीला खूप चांगले माहिती आहे.

आपले घर पुण्यात वाढलेल्या गौरींनी केव्हाच सोडले असून तृतीयपंथी असल्यामुळे समाजातून मिळणारी वागणूक ही अपमानास्पदच होती. पण तरी देखील गौरी खचली नाही. ‘सखी चार चौघी’ नावाची स्वयंसेवी संस्था तिने स्थापन केली. गौरी आता देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी लढत आहे. या मुलांचे आयुष्य त्यांच्या आईप्रमाणेच भविष्य अंधारात कोंडले जाऊ नये एवढाच प्रयत्न तिचा आहे. म्हणूनच आपल्या स्वत:च्या मालकीची जागा देऊन तिथे या मुलांसाठी मोठे घर बांधण्याचा तिचा निर्धार आहे. आपल्याकडे ही मुले अधिक सुरक्षित राहतील पण त्याचबरोबर या मुलांचे भविष्यही सुधारण्यास मदत होईल असे गौरीला वाटत आहे. गौरी या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी धडपड करत आहे आणि त्यासाठी मदतही गोळा करत आहे. ती लवकरच आपले हे स्वप्न पूर्ण करणार आहे आणि तिच्यामुळे अशा अनेक मुलांचे भविष्य घडणार आहे हे नक्की.

Leave a Comment