स्पर्धा परीक्षांचे बदलते चित्र


स्वातंत्र्यानंतरची तीस पस्तीस वर्षे महाराष्ट्राचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांत मागे पडण्याची होती. १९८० पर्यंत स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर व्हायचे तेव्हा यात महाराष्ट्र कोठे दिसतो असा प्रश्‍न हमखास विचारला जायचा आणि त्याचे उत्तर नकारात्मक असायचे. एखादाच मराठी विद्यार्थी त्या ५०० नावांमध्ये झळकलेला दिसायचा. कधी कधी तर एकही मराठी विद्यार्थी त्या यादीत नसे. १९७२ साली महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्ष सुरू केले आणि त्यामुळे मराठी तरुणांना स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळायला लागून त्यांची संख्या या स्पर्धात्मक परीक्षांच्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत वाढायला लागली.

साधारण याच सुमारास केंद्रीय आणि राज्य पातळीवरील सर्व स्पर्धा परीक्षा प्रादेशिक भाषांतून देण्याची सवलत जाहीर झाली आणि त्याचाही फायदा मराठी तरुणांना मिळाला. कारण महाराष्ट्रात इंग्रजी बोलण्याची परंपरा नाही. दक्षिण भारतातला एखादा विद्यार्थी सहजपणे इंग्रजी बोलतो. त्याला तेवढ्या सहजतेने हिंदी बोलता येत नाही. परंतु इंग्रजी येत असल्यामुळे तो इंग्रजीला घाबरत नाही. आयएएस सारख्या उच्च परीक्षांसाठी मराठी तरुण फारसे तयार होत नसत. त्यामागचे इंग्रजी हे एक कारण होते. ते कारण आता उरले नसल्यामुळे या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्तीर्ण व्हायला लागले आहेत. त्यांना निरनिराळ्या ठिकाणी उपलब्ध असणार्‍या खासगी कोचिंग क्लासेसचाही फायदा होताना दिसत आहे.

या परीक्षांमध्ये केवळ मराठी मुले उत्तीर्ण होतात एवढाच एक बदल झालेला आहे असे नाही. तर ग्रामीण भागातली मुले प्राधान्याने या परीक्षांमध्ये चमकत आहेत. शहरातली मुले हुशार असतात आणि ग्रामीण भागातली मुले मागासलेली असतात हा समज या यशस्वी विद्यार्थ्यांनी चुकीचा ठरवलेला आहे. वेळ पडल्यास ग्रामीण भागातली मुले शहरातल्या मुलांपेक्षाही चांगले गुण मिळवू शकतात. या स्पर्धेत शेतकर्‍यांची मुलेसुध्दा अहमहमिकेने उतरत असून यशस्वी होत आहेत. या त्यांच्या यशात घरची गरिबी असूनसुध्दा त्यांना वाटेल ती मदत करणार्‍या पालकांचाही मोठा हिस्सा आहे. दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे दहावी-बारावीच्या परीक्षांप्रमाणेच याही परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत. ही बहुजन समाजातली मुले आणि मुली आता प्रशासकीय सेवेत येऊन प्रशासकीय सेवेचा चेहरामोहरा बदलून टाकतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment