अफगाणिस्तानातील स्फोट


अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटात ९० लोक मारले गेले आणि जवळपास ४०० लोक जखमी झाले. अफगाणिस्तान हा देश तसा दहशतवादाने त्रस्त झालेला आहे आणि हिंसाचार ही तिथल्या लोकजीवनातली नित्याची बाब होऊन बसली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात एखादा बॉम्बस्फोट झाला याला फार महत्त्व नाही किंवा त्यात काही बातमी नाही मात्र हा बॉम्बस्फोट आंतरराष्ट्रीय बातमीचा विषय ठरला कारण तो भीषण होता. त्यात जीवहानीही मोठी झालेली आहे आणि त्यातल्या विशेष म्हणजे हा बॉम्बस्फोट काबूल शहरात ज्या ठिकाणी विविध देशांच्या वकिलाती आहेत त्या भागात झालेला आहे. या स्फोटाची कारणे अजून उलगडलेली नाहीत आणि त्याची जबाबदारीही कोणी घेतलेली नाही.

या प्रकरणाची चौकशी होईल तेव्हा या सार्‍या गोष्टींचा उलगडा होईल. परंतु आगामी काळात अफगाणिस्तानमध्ये काय घडणार आहे याची चुणूक या स्फोटाने आणून दिलेली आहे. अफगाणिस्तानात जोपर्यंत अमेरिकेचे लष्कर होते तोपर्यंत तिथले तालिबानी दहशतवादी फार डोके वर काढत नव्हते. मात्र आता अमेरिकन सैनिकांनी हळूहळू माघार घ्यायला सुरूवात केली आहे आणि अमेरिकेतल्या नव्या सरकारने अफगाणिस्तानातून माघार घेण्याच्या धोरणाचाच पाठपुरावा करायचे ठरवलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता अफगाणिस्तानात अमेरिकेचे ४ हजार जवान उरलेले असून ५ हजार जवान हे नाटो राष्ट्रांचे शांती सैनिक म्हणून राहिलेले आहेत.

ही माघार अजून पूर्ण झालेली नाही. पण दरम्यान अफगाणिस्तानच्या एक तृतियांश भूभागावर तालिबानी संघटनांनी कब्जा मिळवलेला आहे. अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे माघार घेईल तेव्हा हळूहळू तालिबानी संघटनांची सरशी व्हायला लागेल आणि बघता बघता पुन्हा एकदा अफगाणिस्तानला तालिबान नियंत्रित पुराणमतवादी राष्ट्र असे स्वरूप यायला लागेल. अमेरिकन सैनिक येण्याच्या आधी तालिबानी फतवे आणि अट्टाहास त्यामुळे अफगाणिस्तानातली जनता बंदिवासातली जीवन जगत होती. अमेरिकेने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून थोडी स्थिती सुधारली. परंतु पुन्हा एकदा अमेरिकन सैन्य माघार घ्यायला लागले आहे आणि तालिबान संघटनांची सरशी व्हायला लागली आहे. अफगाणिस्तानचे जनजीवन पुन्हा एकदा अंधारयुगाकडे वाटचाल करू लागले आहे.

Leave a Comment