पवार आणि निवृत्ती


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री शरद पवार यांनी काल जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात बोलताना पंचाहत्तरी गाठणार्‍या नेत्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्त होऊन तरुणांना पुढे करावे असे आवाहन केले. खुद्द श्री शरद पवार यांनी पंचाहत्तरी गाठलेली आहे त्यामुळे हा नियम त्यांनाही लागू होतो. अर्थात पवारांनी निवृत्तीचा हा सल्ला लोकासांगे ब्रह्मज्ञान या न्यायाने दिलेला नाही तर त्या निवृत्तीच्या कल्पनेत त्यांनी स्वतःचाही समावेश केलेला आहे. त्यांनी हे आवाहन केले तेव्हा व्यासपीठावर स्वतः अरुणभाई गुजराथी आणि सुशीलकुमार शिंदे हे दोघेही अमृतमहोत्सव पार पडलेले नेते होतेच त्यामुळे पवारांनी त्यांना उद्देशूनच हे आवाहन केले.

राजकारणी लोकांना निवृत्ती असावी की नाही हा मोठा गोंधळात टाकणारा प्रश्‍न नेहमीच चर्चिला जात असतो. कै. बाळासाहेब ठाकरे यांनी तर राजकारण्यांना पासष्ठीतच निवृत्त व्हायला सांगितले होते. अर्थात त्यांचा तो सल्ला कोणी फारसा मनावर घेतला नाही. कारण लहान मोठे नेते पासष्ठीतच काय पण साठीतच निवृत्त होतात मात्र पंतप्रधानपद किंवा राष्ट्रपतीपद अशी सर्वोच्च पदे प्राप्त करू पाहणार्‍या नेत्यांना तिथंपर्यंत वाटचाल करता करता पासष्ठी कधी संपली हे कळतसुध्दा नाही. तेव्हा एखादा नेता राज्य पातळीवरील पद भूषवून राष्ट्रीय पातळीवर जातो आणि तिथे बरेच काम केल्यानंतर त्याच्या नावाची राष्ट्रपती पदासाठी चर्चा होते. तोपर्यंत त्याचे वय पंचाहत्तरीच्या पुढे गेलेले असते. आता लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाची अशी चर्चा होत आहे पण त्या पातळीला जाईपर्यंत त्यांनी नव्वदी ओलांडली आहे.

अशा उच्चपदाचा अपवाद सोडला तर एकाच पदावर नव्वद वर्षे उलटेपर्यंत राहणार्‍या नेत्यांना मात्र निवृत्तीचा सल्ला द्यावासा वाटतो. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंद, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, सांगोल्याचे आ. गणपतराव देशमुख असे काही नेते नव्वदी ओलांडूनसुध्दा राजकारणात सक्रीय आहेत. अशा नेत्यांनी ५०-५० वर्षे एकाच पदावर काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना त्याच पदावर राहायचे असेल तर मात्र निवृत्ती घेतली पाहिजे. अर्थात ही निवृत्ती ते स्वतःहून घेत नसतील तर जनतेने त्यांना निवृत्त केले पाहिजे.

Leave a Comment