
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक २००० आणि ५०० च्या नव्या नोटीनंतर आता १ रुपयाची नोट दैनंदिन चलनात आणणार आहे.
आता दैनंदिन चलनात येणार १ रुपयाची नवी नोट
मंगळवारी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक रिझर्व्ह बँकेने जारी केले. या पत्रकात म्हटल्याप्रमाणे भारत सरकारकडून एका रूपयाच्या नव्या नोटेची छपाई पूर्ण झाली आहे. नव्या नोटा चलनात आल्यानंतरही सध्या चलनात असलेल्या एक रूपयाच्या जुन्या नोटा वैधच राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. यावेळी रिझर्व्ह बँकेने दोन हजार आणि पाचशे रूपये मुल्याच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. त्यानंतर आता एक रुपयाची नोट बाजारात येण्यास सज्ज झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रत्येकालाच एक रुपयाची नवी नोट कशी असणार याबद्दल उत्सुकता आहे. त्याबद्दलची माहितीही देण्यात आली आहे. नवीन नोट पुढच्या आणि पाठच्या दोन्ही बाजुंनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल. या नोटेच्या दोन्ही बाजुंना केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांची स्वाक्षरी असेल. या नोटेवर ‘भारत सरकार’ या शब्दांबरोबरच एक रूपयाच्या नव्या नाण्याची प्रतिकृतीही असेल. तसेच भारतातील सर्व चलनी नोटांवरील ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य नोटेवर छापण्यात आले आहे. नोटेच्या अन्य भागावर महाराष्ट्रातील ‘सागर सम्राट’ या तेल उत्खनन केंद्राची प्रतिमा आहे. याशिवाय, नोटेवर ‘L’ हे अक्षर कॅपिटलमध्ये छापण्यात आले आहे. तसेच नोटेवर अशोक स्तंभाच्या प्रतिमेबरोबर ‘१’ ही संख्या आणि ‘भारत’ हा शब्द अदृश्य स्वरूपात छापण्यात आला आहे.
