केवळ ५०० रुपयांत १०० जीबी डेटा देणार जिओ


मुंबई – रिलायन्स जिओने मोबाईलच्या वापरकर्त्यांना मोफत इंटरनेट सुविधा देत चांगलेच खूश केले होते. पण आता याचाच पुढचा टप्पा म्हणजे ब्रॉडबॅंड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी जिओने एका नव्या ऑफरची नुकतीच घोषणा केली आहे. ग्राहकांना यामध्ये केवळ ५०० रुपयांमध्ये १०० जीबी इंटरनेट डेटा दिला जाणार आहे. आता काही शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर असणारी ही ऑफर देशभरातील ग्राहकांना दिवाळी दरम्यान उपलब्ध होणार असल्याचे रिलायन्स जिओकडून जाहीर करण्यात आले.

ग्राहकांना यामध्ये १०० एमबीपीएस एवढ्या वेगाने इंटरनेट घेता येणार आहे. अशाप्रकारचा ब्रॉडबॅंड प्लॅन मे महिन्यामध्ये मुंबई आणि चेन्नई या दोन शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर दिल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सध्या ही ऑफर मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, जामनगर, सूरत आणि वडोदरा या शहरांमध्ये देण्यात आली आहे. तर दिवाळीच्या सुमारास ही ऑफर देशभरातील इतर शहरांमध्येही उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

रिलायन्स जिओ अशाप्रकारे ब्रॉडबॅंडची आकर्षक ऑफर देऊन पुन्हा एकदा ग्राहकांना इतर स्पर्धक कंपन्यांपासून आपल्याकडे आकर्षित करण्याची शक्यता आहे. स्पर्धक कंपन्यांचा विचार केला तर आता एअरटेलकडून ब्रॉडबॅंडसाठी ऑनलाईन बुकींग केल्यास १ हजार जीबी डेटा वर्षभरासाठी मोफत देण्यात येत आहे. याशिवाय त्यापुढे ६० जीबी डेटा ८९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय एअरटेल कंपनी १०९९ रुपयांमध्ये ४० एमबीपीएस वेगाने ९० जीबी डेटा असाही प्लॅन आहे, ज्यामध्ये सुरुवातीच्या वर्षासाठी १००० जीबी डेटा पूर्णपणे मोफत देण्यात आला आहे. याशिवाय टाटा डोकोमो, वोडाफोन यांसारख्या इतर कंपन्यांकडूनही विविध ऑफर देण्यात येतात. मात्र रिलाय़न्स जिओने ५०० रुपयांमध्ये १०० जीबी डेटा दिल्यास ब्रॉडबॅंडच्या मार्केटमध्ये जिओ नक्कीच आपले वेगळे स्थान निर्माण करेल.

Leave a Comment