संतांनी म्हटले आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. मुंबईतल्या एका पोलीस अधिकार्याला आणि त्याच्या पत्नीला या उक्तीचा वेगळ्या प्रकाराने अनुभव आला. या दांपत्याच्या पोटी असे एकुलते एक रत्न जन्माला आले की, ज्याने आपल्या आईचा काटा काढला. तिला अनेक ठिकाणी भोसकून ठार केले. तिच्याच रक्ताने प्रेताजवळ संदेश लिहिला. आपण तिच्या भुनभुनीला वैतागलो होतां म्हणून तिला संपवून टाकले आहे असे त्यात म्हटले होते. नंतर त्याला अटक करण्यात आली. तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. आपल्याला आईला सजा द्यायची होती पण तिला मारून टाकावे असा आपला हेतू नव्हता असे त्याने कबुली जबाबात म्हटले आहे पण तरीही आपण तिला ठार केले याची त्याला थोडीशीही उपरती झालेली नाही.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा………..
असा काही प्रकार केल्यास आपल्याला किमान जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते याची जाणीव असावी एवढे या मुलाचे वय आहे. म्हणजे तो आपल्या कृत्याच्या परिणामांबाबत अगदीच अनभिज्ञ होता असे नाही. तशी परिणामांची जाणीव सगळ्याच गुन्हेगारांत असते. पण रागाच्या भरात ते काही तरी करून बसतात. तेवढ्या क्षणापुरता त्यांचा आपल्या मंेंदूतल्या विवेकाच्या केन्द्रावरचा ताबा सुटलेला असतो. तसा प्रकार या मुलाच्या बाबतीत घडला असण्याची शक्यता आहे पण त्याच्या सारासार विवेकावर विकाराचे अतिक्रमण व्हावे असा राग त्याला कशामुळे आला होता ? हे कारण कळल्यावर आपल्याला हे लक्षात येते की, आज प्रत्येक घराघरात असे गुन्हेगार आपण तयार करीत आहोत.
या मुलाची आई उच्चशिक्षित होती आणि ती परदेशातून शिकून आली होती. आपल्या मुलाने आपल्या प्रमाणेच शिक्षण घ्यावे आणि त्याने चांगले करीयर करावे असा तिचा अट्टाहास होता. आपली त्याच्याकडून काहीही अपेक्षा असली तरीही त्याची तेवढी क्षमता आहे का याचा विचार तिच्या मनात आला नव्हता. म्हणजे ती आपल्या मुलावर आपली महत्त्वाकांक्षा लादत होती. हाच या दोघांतल्या नात्यातला संघर्ष होता. यापासून आपण काही धडा घेणार आहोत की नाही? आज आपल्या प्रतिष्ठेच्या कल्पना या मुलांचे शिक्षण आणि त्याची चांगल्या पगाराची नोकरी या गोष्टींभोवती केन्द्रित व्हायला लागल्या आहेत. मुलाला ज्या शिक्षणात रस आहे आणि ज्या शिक्षणातून त्याला आनंद मिळतो त्याच शिक्षणात त्याला करीयर करायला लावले पाहिजे. आपण कोणाशी तरी बरोबरी करण्याच्या कल्पनेने भारावलेलो असतो. त्यातून असे प्रकार घडतात.