शेरेखोरीचे प्रदर्शन


आपण प्रदर्शन भरवताना चांगल्या गोष्टीचे भरवतो. शक्यतो एखाद्या चित्रकाराच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले जाते. ती चित्रे कौतुकास्पद असतात म्हणून ती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली जातात आणि त्यासाठी प्रदर्शन भरवले जाते. पण विलेपार्ले येथे श्री. वा. फाटक वाचनालयाने वाचकांनी काय करू नये याचा संदेश लोकांपर्यंत पोचावा म्हणून काही वाचकांच्या नस्त्या उद्योेगाचे प्रदर्शन भरवण्याची घोषणा केली आहे. हे प्रदर्शन पुस्तकांचेच आहे पण प्रदर्शनात पुस्तके मिटवून ठेवली जाणार नाहीत. उघडून ठेवली जाणार आहेत. साधारणत: पुस्तकांचे वाचन करणारा वाचक हा सामान्य वाचक असतो आणि तो पुस्तकाचा आस्वाद मन:पूर्वक घेत असतो. काही वाचक मात्र ते पुस्तक समीक्षकाच्या नजरेतून वाचतात.

अर्थात एखादे पुस्तक रसग्रहणासह वाचल्याने काही बिघडत नाही. उलट असे रसग्रहण लेखकाला आवडत असते. त्यामुळे आपले पुस्तक कोणा तरी समीक्षकाने वाचावे आणि त्यावर एगाद्या नामवंंत दैनिकात त्याचे समीक्षण छापून यावे अशी लेखकाचीही इच्छा असते. पण काही वाचकांना आपले त्या पुस्तकाबाबतचे मत कोणा दैनिकात छापून येण्यात काही मतलब नसतो. त्यांचे त्या पुस्तकाबाबतचे मत त्यांना ताबडतोब आणि एक दोन वाक्यात व्यक्त करायचे असते. त्याचा हा अभिप्राय कोणत्याही र्दैनिकात छापून येण्याची शक्यता नसते आणि त्यालाही त्याची जाणीव असते. मग असे समीक्षक कम वाचक आपले ते मत त्याच पुस्तकात कोठे तरी आपल्या हाताने लिहून आपली हौस भागवतात.

या प्रकाराला आपले मत व्यक्त करणे असे म्हणायला काही हरकत नाही. काही वाचक पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर एकुणच पुस्तकावर आपले मत व्यक्त करतात पण काही वाचकांना पुस्तकातला जो भाग खटकत असतो त्या भागाच्या आसपास मार्जिनमध्ये आपला शेरा लिहून टाकतात. काही वाचक तर पुस्तकाच्या पहिल्याच पानावर आपली शेरेबाजी उमटवतात. काही लोक आपल्या आवडलेल्या किंवा खटकलेल्या भागातल्या ओळी केवळ अधोरेखित करतात. अशा शेर्‍यांचे हे प्रदर्शन असणार आहे. वाचकांनी अशी शेरेेबाजी केल्यास पुस्तक किती खराब होते हे लोकांना कळावे म्हणून हे प्रदर्शन भरवले जात आहे. आता काही प्रकाशकांनी पुस्तकाच्या शेवटी दोन कोरी पाने जोडून अशा शेरेबाजांची सोय केली आहे. अशा वाचकांना जे काही लिहायचे असेल ते त्यांना या पानांत लिहावे आणि आपले नाव टाकून ते प्रकाशकाला पाठवावे अशी अपेक्षा त्यामागे आहे. म्हणजे पुस्तकाविषयीचा अभिप्राय नेमक्या माणसापर्यंत पोचेल. आता अशा वाचकांना ही सोय झाली आहे.

Leave a Comment