सिनेमाचे वेड


नाशिक शहरातील १२ ते १५ वर्षे वयोगटातील ६ मुली अचानकपणे बेपत्ता झाल्या आणि त्यांचे पालक अस्वस्थ झाले. मुली घरी परत येण्याची बरीच वाट पाहून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांची तपासाची चक्र्रे फिरायला लागली. दोन दिवसांनंतर या मुली मुंबईमध्ये शाहरूख खानच्या घरासमोर सापडल्या. या सगळ्या मुली परस्पराच्या बहिणी आहेत आणि त्यांना चित्रपटांचे विलक्षण वेड आहे, असे तपासाअंती लक्षात आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता शाहरूख खानला याची देही याची डोळा प्रत्यक्ष बघण्याच्या कल्पनेने झपाटून जाऊन या मुली घरातून निघाल्या आणि शाहरूख खानचे घर शोधत शोधत तिथे आल्या. घरातून निघाल्यानंतर या मुलींनी आधी एका मंदिरात मुक्काम केला आणि रात्रीच नाशिक रोडला येऊन रेल्वे पकडून मुंबई गाठली.

दोन दिवस त्यांनी खाण्यापिण्याची सोय काय केली याचे काही तपशील अजून उपलब्ध झालेले नाहीत. परंतु एकंदर बातमीवरून तरी या मुली चांगल्या घरातल्या होत्या आणि त्यांच्याकडे हा सगळा प्रवास करण्याएवढे पैसे होते असे लक्षात येते. त्यांच्या सुदैवाने या मुली एकट्याच चाललेल्या बघून आणि त्यांच्या बरोबर कोणीही मोठा माणूस नाही याचा फायदा घेऊन त्या मुलींना कोणी पळवून नेले नाही. परंतु या मुलींची मनःस्थिती आणि चित्रपटातल्या अभिनेत्यांविषयी या वयातल्या मुलामुलींना वाटत असलेले वेडे आकर्षण या गोष्टी नक्कीच चिंता करायला लावणार्‍या आहेत. अजून जीवनाची कसलीही जाण आलेली नसण्याच्या या वयात जास्त स्वातंत्र्य मिळाले की असे होऊ शकते.

चित्रपट आणि अन्य माध्यमातून समोर येणारी आकर्ष व्यक्तिमत्वे अशा वयात मुलामुलींवर प्रभाव टाकू शकतात. परंतु या प्रभावासोबत त्यांना शिक्षण मिळण्याची गरज आहे. आपल्याला ज्यांचे आकर्षण वाटतेे ते लोक चित्रपटात चांगले दिसत असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात ते लोक आकर्षण वाटावे असे नसतात. चित्रपटातली त्यांची भूमिका आणि त्यांची प्रत्यक्ष आयुष्यातली भूमिका यात विसंगतीही असू शकते. त्यामुळे पडद्यावर दिसणार्‍या भूमिकेवरून आपण त्यांना आपला आदर्श मानता कामा नये हे त्यांना सांगण्याची गरज असतेे. सध्याच्या समाजावर माध्यमांचा मोठा प्रभाव आहे. ही गोष्ट कोणीही नाकारणार नाही. परंतु माध्यमे जसजसी आपल्या जीवनावर प्रभाव टाकत आहेत तसतसे तरुण मुलामुलींचे माध्यमांच्या संबंधातील प्रबोधन होण्याचीही गरज आहे.

Leave a Comment