हे करावेच लागेेल


गडीचरोली जिल्ह्यातल्या सुरजागड येथील लोह खनिजाच्या उत्खननाचे काम भारी पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी त्याला विरोध केला असून खाणींच्या आसपासच्या भागांत उत्खननाच्या विरोधात वातावरण तयार केेले आहे. हे उत्खनन आदिवासींच्या हिताच्या विरोधात असल्याचा मतलबी प्रचार नक्षलवादी करीत आहेत आणि डाव्या चळवळीतले त्यांना अनुकूल असलेले काही बुद्धीवादी लोक या खाणींमुळे पर्यावरणाचा नाश होत असल्याचे अशीच मतलबी ओरड करून अप्रत्यक्षपणे नक्षलवाद्यांना मदत करीत आहेत. या लोकांना विकास नको आहे कारण विकास आणि प्रगती हे त्यांचे शत्रू आहेत. जोपर्यंत आदिवासी भागात गरिबी आहे तोपर्यंतच त्यांचा नक्षलवाद या भागात वाढणार आहे.

हे लोक लोखंडाच्या खाणीतून खनिज उकरण्यास विरोध करीत आहेत आणि त्यांचा विरोध विकासाला आहे पण हे लोक आपला हा विकास विरोधी तोंडावळा लोकांसमोर येऊ नये यासाठी या विरोधाला पर्यावरणाच्या नाशाला विरोध असा बुरखा पांघरत आहेत. लोखंडाच्या उत्खननाने पर्यावरणाचा नाश कसा होणार याचे नेमके उत्तर त्यांच्याकडे नाही पण काही चुकीच्या गोष्टी समाजात पसरवून ते तसा भास निर्माण करीत आहेत. असे असले तरी लोखंडाच्या उत्खननाशिवाय यंत्रे कशी तयार होणार आणि यंत्रेच निर्माण झाली नाहीत तर कारखाने कसे उभारणार असा प्रश्‍न त्यांना विचारावा लागेल. त्यांच्याकडे या प्रश्‍नाचे उत्तर नाही. एका बाजूला हेच लोेक रोजगार निर्मितीची मागणी करीत असतात. बेरोजगारीचे चित्र तेच समाजासमोर भडकपणे रंगवत असतात. त्यांना रोजगार पाहिजे पण कारखाने मात्र नकोत. कारखानेच निघाले नाहीत तर कारखाने कसे उभारणार ?

सरकारला अशा लोकांच्या विरोधाची चिंता करीत बसण्याचे कारण नसते. सरकारने या भागात आधी नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी मोहीम काढून अनेक नक्षलवादी मारले आहेत आणि त्यांना निष्प्रभ केले आहे. सुकना येथे झालेल्या राखीव पोलिसांवरील हल्ल्यानंतर सरकारने तेथे मोठी कारवाई सुरू करून नक्षलवाद्यांची नांगी मोडली आहे. आता काही दिवस तरी ते डोके वर काढणार नाहीत. अशा शांततेच्या काळातच पण पोलिसांच्या कडक पहार्‍यात खाणीतले उत्खनन सुरू करून सरकारने आपले कर्तव्य बजावले आहे. सरकारला हे करावेच लागेल कारण राज्याचा विकास या भागातल्या लोह खनिजावर बराच अवलंबून आहे.

Leave a Comment