जनुकीय मोहरीला विरोध


आपल्या देशात हरित क्रांती झाल्याचा दावा केला जातो. परंतु ती क्रांती केवळ गहू आणि तांदूळ या दोन पिकांच्या बाबतीतच झालेली आहे. त्यामुळे आपण अजूनही डाळी आणि तेलबिया यांच्याबाबतीत परावलंबी आहोत. याबाबत स्वावलंबन साध्य करण्याकरिता शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. परंतु काही प्रतिगामी पर्यावरणवादी या प्रयत्नांच्या आड येत आहेत आणि शास्त्रज्ञांनी सुचवलेल्या नव्या बदलांना बिनबुडाचा विरोध करत आहेत. देश तेलबियांच्या बाबतीत स्वावलंबी व्हावा म्हणून शास्त्रज्ञांनी जनुकीय बदल केलेल्या मोहरीच्या बियाणांचा शोध लावलेला आहे. उत्तर भारतात मोहरीचे तेल मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. त्यामुळे जनुकीय बदल केलेली मोहरी लावली गेली तर मोहरीचे उत्पादन वाढेल आणि त्यामुळे मोहरीचे तेल मुबलकपणे उपलब्ध होईल.

आपल्या देशामध्ये जनुकीय बदल केलेल्या वाणांवर वाद चालू आहे. परंतु या वादामध्ये पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि सेंंद्रिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांची संघटना उतरलेली आहे. या संघटनांनी जनुकीय बदल केलेल्या बियाणांना विरोध करायला सुरूवात केली आहे. खरे म्हणजे जनुकीय बदल केलेले बियाणे वापरावे की नाही हा अशा संघटनांचा विषय नसतो. तो शास्त्रज्ञांचा विषय असतो. आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांनी मोहरीच्या अशा बियांवर संशोधन केलेले आहे आणि संशोधनानंतरच त्यांनी या बियाण्याच्या वापराची शिफारस केली आहे. त्या क्षेत्रातल्या तज्ञांनी अशी अनुमती दिल्यानंतर ज्यांना या क्षेत्राची माहिती नाही त्यांच्या विरोधाची पर्वा करण्याची काही गरज नाही. परंतु या संघटनांनी सरकावर दबाव आणायला सुरूवात केली आहे.

त्यांनी नुकताच पर्यावरण मंत्रालयावर मोर्चा काढला आणि जनुकीय बदलामुळे काय धोके संभवतात. याची आतिशयोक्त वर्णन करणारी निवेदने दिली. वास्तविक या धोक्यांना कसलाही शास्त्रीय आधार नाही. जगातल्या अनेक देशांमध्ये जनुकीय बियाणे सरसकट वापरले जाते. त्यामुळे त्याचे आरोग्यावर परिणाम होतील, त्यामुळे मूळ बियाणे नष्ट होईल वगैरे वर्णने ही अशास्त्रीय ठरतात. वास्तविक पाहता हा विरोध करणारे पर्यावरणवादी हे स्वतःला पर्यावरणवादी म्हणवतात परंतु पर्यावरणाचा आणि प्रदुषणाचा कसलाही अभ्यास त्यांनी केलेला नसतो. संशोधन केलेले नसते. त्यामुळे त्यांच्या आक्षेपांना कसलाही तर्कशुध्द आधार नसतो. परंतु असेच हे लोक नव्या बदलाला विरोध करत आहेत आणि देशाचे प्रगतीकडे पडणारे पाऊल मागे खेचत आहेत.

Leave a Comment