देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात


पुणे : पुण्यात देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण होत असून सोलापुरातील २१ वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचे गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्यात येत आहे. अत्यंत गुंतागुंतीची मानली जाणारी ही शस्त्रक्रिया १२ निष्णात डॉक्टरांची टीम करत आहेत.

भारतात पहिल्यांदाच इतर देशांमध्ये यशस्वीरित्या पार पडलेले गर्भाशयाचे ट्रान्सप्लांटेशन होणार आहे. तीन महिलांच्या शरीरात त्यांच्या आईच्या गर्भाशयाचे पुण्याच्या रुग्णालयात प्रत्यारोपण केले जाणार आहे. गुरुवारी सकाळी या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली असून आईच्या शरीरातील गर्भाशय काढून मुलीला प्रत्यारोपण करण्याच्या प्रक्रियेला आठ तास लागणार आहेत. त्याचप्रमाणे बडोद्याच्या २४ वर्षीय तरुणीवरही शुक्रवारी गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. तिलाही तिच्या आईचे गर्भाशय दान करण्यात येईल. या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास दोन्ही तरुणींना मातृत्वसुख अनुभवता येईल.

सात ते आठ लाख रुपयांच्या घरात दोन्ही तरुणींवरील शस्त्रक्रियेचा खर्च आहे, मात्र हे प्रत्यारोपण मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आणखी एका महिलेला गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. हे प्रत्यारोपण पुण्याच्या गॅलक्सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिट्यूटमध्ये (जीएलसीआय) होत आहे. राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने ‘जीएलसीआय’ला गर्भाशय प्रत्यारोपणाचा परवाना दिला होता. पाच वर्षांसाठी हा परवाना प्राप्त झाला आहे. जगभरात आतापर्यंत फक्त २५ गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यातही प्रत्यारोपणानंतर केवळ दहा महिलांना गर्भधारणा झाली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची परवानगी बंगळुरुच्या ‘मिलान इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ’लाही दोन महिलांचे गर्भाशय प्रत्यारोपण करण्यासाठी मिळाली आहे. गर्भाशयाशी संबंधित काही कारणांमुळे अनेक महिलांना मूल होत नाही. धक्कादायक म्हणजे जगातील जवळपास तीन ते चार टक्के महिला या कारणामुळे मातृत्वापासून वंचित राहतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment