‘रॅन्समवेअर’बाबत हेल्पलाइनवरहजाराहून अधिक तक्रारी


मुंबई : ‘रॅन्समवेअर व्हायरस’च्या हल्ल्याचा भारतात फारसा प्रभाव नसल्याचे सरकारी पातळीवरून सांगितले जात असले तरी या सायबर हल्ल्याबाबत महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर तक्रारी नोंदविणारे १ हजार २८२ दूरध्वनी आले आहेत. या सायबर हल्ल्यांमध्ये पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांचे लॅपटॅाप आणि शासकीय विभागांचे संगणकही प्रभावित झाले आहेत.

‘रॅन्समवेअर व्हायरस’च्या हल्ल्यापासून रोखण्यासाठी अथवा त्याबाबत तक्रारी देणे, माहिती, मार्गदर्शन यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने ०२५३ ६६३१७७७ ही हेल्पलाइन चार दिवसांसाठी सुरू केली. मात्र, या हेल्पलाइनला मिळालेला प्रतिसाद पाहून ही मुदत आणखी एक दिवस वाढवण्यात आली आहे. पहिल्या दिवशी या क्रमांकावर २८२ दूरध्वनी हेल्पलाइनवर आले. दुसऱ्या दिवशी ७००; तर तिसऱ्या दिवशी ३०० दूरध्वनी आल्याशे सायबर विभागाकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर या व्हायरसच्या इंटरनेटवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नॅशनल क्रिटिकल इन्फर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटरने विशेष यंत्रणा उभी केली आहे.

राज्यात विविध खासगी कंपन्या आणि व्यक्तिगत संगणक अथवा ई मेल यावर ‘रॅन्समवेअर’च्या माध्यमातून १ हजार २८२ सायबर हल्ले झाल्याची माहिती मिळत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या हल्ल्यांचे प्रमण अधिक आहे. अशा हल्ल्यांतून संरक्षण मिळावे यासाठी मायक्रोसॉफ्टचे पॅच http://technet.microsoft.com/en-us/library/security/ms17-010.aspx हे सर्व शासकीय कार्यालये, बँका आणि इतर महत्त्वाच्या कंपन्यांना पाठविण्यात आले आहे.

Leave a Comment