नगरसेवकाच्या घरात कॉपी


औरंगाबादेत पोलिसांनी सामूहिक कॉपीचा एक अजब प्रकार उघड केला आणि या प्रकरणात २६ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यात तीन मुलीही आहेत. हे विद्यार्थी शिवसेनेच्या नगरसेवकाच्या घरात बसून आपल्या उत्तर पत्रिका लिहीत होते. हे विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आहेत. ते परीक्षेला बसले होते. पण त्यांनी आपल्या उत्तर पत्रिकांवर केवळ एका प्रश्‍नाचे उत्तर लिहून ती बाहेर आणली होती. नंतर ते या नगरसेवकाच्या घरात बसून आपल्या उत्तर पत्रिकेतली अन्य उत्तरे सावकाशीने लिहीत होते. अर्थात त्यांना या प्रश्‍नांची उत्तरे माहीत नव्हती हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही कारण त्यांना या उत्तर पत्रिका लिहायला त्यांचे प्राध्यापकच मदत आणि मार्गदर्शन करीत होते.

अशा प्रकारची कॉपी आजवर कोणी पाहिलीही नसेल आणि ऐकलीही नसेल. या संबंधात हे २६ विद्यार्थी आणि त्यांच्या प्राध्यापकांना ताब्यात घेण्यात आले असले तरीही या प्रकरणात अनेकांचा हात असणार. कारण महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मूक संमतीशिवाय हा प्रकार घडणे अगदी अशक्य आहे. शिवाय अशा परीक्षांना बाहेरचे परीक्षक आलेले असतात. त्यांनाही हा प्रकार माहीत असणार कारण परीक्षेेची वेळ संपली तरीही २६ प्रश्‍न पत्रिका बाहेरच होत्या. म्हणजे या प्रकारात अनेकांना आर्थिक लाभ झालेला असणार. म्हणून सरकारने या सार्‍या सार्‍यांची चौकशी करायला हवी. या प्रकारामागे जे जे असतील त्यांना शिक्षा झाल्या पाहिजेत.

या प्रकारात प्राध्यापकच मुलांना उत्तरे सांगत होते. याचा अर्थ प्राध्यापकांनी मोठा मोबदला घेऊन हे काम केले असणार. अशा रितीने ही मुले इंजिनियर होतात. सध्या आपल्या देशात शिक्षणाचा दर्जा विशेषत: अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या शिक्षणाचा दर्जा हा चर्चेचा विषय झाला आहे. देशातले केवळ ३० टक्के अभियांत्रिकी पदवीधर नोकरी देण्याच्या लायकीचे आहेत असे सांगितले जात आहे. अशा सामूहिक कॉपीच्या मदतीने ही मुले इंजिनियर होणार असतील तर ती मुले जगातल्या कोणत्याही मुलाखतीत पास होणार नाहीत. अशा मुलांना कोठेही नोकरी मिळणे शक्य नाही कारण त्यांच्या हातात अभियांत्रिकीची पदवी आहे पण त्यांना त्या पदवीचे ज्ञान नाही. खाजगी उद्योजक तर अशा इंजिनियर्सना समोर उभेही करीत नाहीत. मग अशी मुले आणि त्यांचे पालक म्हणणार, हजारो तरुण पदवी घेऊन बाहेर पडले आहेत पण त्यांना नोकर्‍या मिळत नाहीत. सरकार काय करते आहे? बेकारी का हटवत नाही. आता असे इंजिनियर असतील तर त्यांना नोकरी कशी मिळेल.

Leave a Comment