मुंबई विद्यापीठात ४७ नवीन अभ्याक्रमांचा समावेश


मुंबई – काही दिवसांपूर्वीच कला, वाणिज्य आणि विज्ञान या विषयाच्या अभ्यासक्रमांत मुंबई विद्यापीठाने बदल केल्यानंतर आता विद्यापीठाने आणखी एक पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षात तब्बल ४७ नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात येणार असल्यामुळे विद्यापीठाचे हे पाऊल विद्यार्थ्यांसाठी अभिनव ठरणार आहे.

प्रमाणपत्र, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. दोन वर्षांतील नवीन अभ्यासक्रमांची ही सर्वाधिक संख्या आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नवे अभ्यासक्रम सुरू करणारे मुंबई विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ ठरणार आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या सोबतीला व्यक्तीमत्व विकास आणि व्यवसायभिमुख अभ्यासक्रांची दारे खुली करून देण्याच्या उद्देशाने यंदा चॉइस बेस क्रेडीट सिस्टिमवर भर देण्यात आला. त्यानुसार कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या संकल्पनेतून नव्या अभ्यासक्रमांचा निर्णय घेण्यात आला आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सेंज, फिल्म इन्स्टिट्यूट आणि इतर क्रीडा संस्थेबरोबर यासाठी करारदेखील करण्यात आले आहे. अॅकेडमिक कौन्सिलची मान्यता या अभ्यासक्रमांना देण्यात आलेली आहे. डिजिटल मार्केटिंगपासून, फूड सायन्स, सायबर सुरक्षा, फायनान्शिअल पत्रकारिता, फाइन आर्टस आणि डायमंड यांसारखे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या विद्याविषयक नियोजनाचे संचालक डॉ. अनिल पाटील यांनी दिली.

एकूण ११ प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा या नवीन ४७ अभ्यासक्रमांत समावेश आहे. यातील अनेक अभ्यासक्रम विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये, तर काही अभ्यासक्रम संबंधित विभागांत सुरू करण्यात आले आहेत. ज्या कॉलेजांना हे नवे अभ्यासक्रम सुरू करायचे असतील त्यांनी विद्यापीठाकडे संपर्क साधल्यास त्याचा विचार करण्याची तयारी विद्यापीठ प्रशासनाने दर्शविली आहे. दोन वर्षांत मुंबई विद्यापीठाने एकूण ६७ नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत.