ओबीओआरला विरोध


चीन हा देश जागतिक राजकारणातील डावपेचांच्या बाबतीत फार मानला जातो. विशेषतः चीनच्या या क्षेत्रातल्या हालचाली म्हणजे त्यांच्या कूटनितीचा एक भाग असतो. या कूटनीतीतील सूत्रे इतरांना फार लवकर लक्षात येत नाहीत. परंतु चिनी नेत्यांनी मात्र त्यावर फार खोलवर आणि लांब पल्ल्याचा विचार केलेला असतो. आता चिनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांच्या स्वप्नातला एक प्रकल्प म्हणून राबवल्या जात असलेल्या ओबीओर (वन बेल्ट वन रोड) प्रकल्पाचा विचार करता येईल. चीन सरकारने पाकिस्तानपर्यंत हा एक रस्ता तयार करण्याची योजना आखली आहे. तिच्यावर विचार करण्यासाठी आज चीनमध्ये एक परिषद होत आहे. या परिषदेत १३० देशांचे १५०० प्रतिनिधी सहभागी होत आहेत. रशिया, फिलिपाईन्स, पाकिस्तान या देशांचा त्यात सहभाग आहे.

भारताने मात्र या परिषदेवर बहिष्कार टाकलेला आहे. कारण चीनचा हा वन बेल्ट वन रोड भारताच्या हद्दीतून चाललेला आहे. काश्मीरच्या उत्तरेला असलेला हा भाग मुळात भारताचा आहे. परंतु आता भारताच्या ताब्यात नाही. चीनने त्यातला काही भाग १९६२ साली झालेल्या युध्दात पादाक्रांत केलेला आहे. तर त्यातला काही भाग पाकिस्तानने १९४८ साली कब्जात घेतलेला आहे. म्हणजे पाकिस्तानने हा भारताचा भाग बळाने ताब्यात घेऊन चीनला आंदण दिलेला आहे. सध्या हे भाग भारताच्या ताब्यात नसले तरी भारताने त्यावरचा दावा सोडलेला नाही. म्हणजे चीनचा हा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे तो भारताच्या मालकीच्या परंतु आता वादग्रस्त असलेल्या भागातून जात आहे. त्यामुळे भारताने परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.

चीनला हा प्रकल्प आवश्यक वाटतो. त्यामागे चीनची दूरदृष्टी आहे. पुढे मागे जागतिक युध्द पेटले तर आपल्याला इंधन लागेल आणि ते इंधन पश्‍चिम आशियातून मिळत असल्यामुळे युध्दजन्य स्थितीतही या इंधनाचा पुरवठा अखंड सुरू रहावा म्हणून हा मार्ग पाकिस्तानमधून पश्‍चिम आशियापर्यंत नेलेला आहे. या मार्गावर उर्जा प्रकल्प, रेल्वे प्रकल्प आणि कारखाने उघडले जातील आणि चीनला गुंतवणूक करायला एक मार्ग उपलब्ध होईल. म्हणून चीन अब्जावधी डॉलर्स खर्च करून या प्रकल्पाचे काम सुरू केलेले आहे. शेवटी पश्‍चिम आशियातील डिझेल हे किती महत्त्वाचे आहे हे या प्रकल्पावरून लक्षात येत आहेच पण चीनसारखी महाशक्ती किती लांबचा विचार करून योजना आखत असते याचेही प्रत्यंतर येते.

Leave a Comment