पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स या पाकिस्तानी विमानसेवेचे १९७६ पासून सुरू असलेले कराची-मुंबई-कराची हे विमान ११ मे पासून बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानी विमान सेवेचे हे विमान भारत आणि पाकिस्तानातल्या अनेक लोकांसाठी जिव्हाळ्याचा विषय होते. कारण कराची हे शहर सिंध प्रांतात आहे. या प्रांतात हिंदूंची संख्या चांगलीच आहे. त्यांचे अनेक नातेवाईक भारतात आहेत आणि भारतातल्या काही मुस्लीम कुटुंबीयांचे नातेवाईक सिंध प्रांतात म्हणजे कराची शहराच्या आसपास वास्तव्यास आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कितीही तणावाचे संबंध असले तरी दोन्ही देशातल्या या नातेवाईकांचा जिव्हाळा काही संपलेला नाही. त्यामुळे अजूनही हे लोक परस्परांना भेटण्यासाठी जात असतात आणि त्यांना हे विमान उपयोगी पडते.
कराची-मुंबई विमान बंद
त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे पाकिस्तानी विमान कंपनीने कराची ते मुंबई या प्रवासाचे तिकिट केवळ ५ हजार ५०० एवढे ठेवलेले आहे. अन्य विमान प्रवासाचे तिकिट कमीत कमी २८ हजार आणि त्याच प्रवासातील बिझनेस क्लाससाठी ४५ हजार रुपये आहे. अन्य विमान प्रवासाचे तिकिट एवढे भरमसाठ असताना मुंबई-कराची याच मार्गावरचे केवळ तिकिट पाकिस्तानच्या कंपनीने ५ हजार ५०० रुपये ठेवले होते. कारगील युध्दाच्या काळाचा अपवाद वगळता ही विमानसेवा १९७६ पासून सलगपणे सुरू होती. आता ती संपुष्टात आली आहे. आता पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स या सेवेचे भारतात केवळ एकच विमान उड्डाण बाकी आहे.
दिल्ली ते लाहोर या छोट्या अंतराचे विमान असून ते मात्र चालू राहणार आहे. कराची-मुंबई विमानसेवा बंद झाल्यामुळे अनेकांची गैरसोय होणार आहे. मुंबईच्या भिंडी बाजार भागामध्ये व्यापार करणारे अनेक मेमन मुस्लीम आणि खोजा मुस्लीम याच विमानाने आपल्या कराचीतल्या नातेवाईकांना भेटायला अधूनमधून जात असत. ही विमानसेवा अचानकपणे बंद झाल्यामुुळे त्यांचे कराचीला जाणे अवघड होऊन बसले आहे. त्यांना रेल्वेने लाहोरला जाऊन तिथून पाकिस्तानात उपलब्ध होणार्या कोणत्याही वाहनांच्या साह्याने कराचीला जावे लागणार आहे. ११ तारखेला या विमानसेवेची शेवटची फेरी झाली तेव्हा तिच्यात बसून कराचीला जाणार्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी आपल्या तिकडे जाणार्या नातेवाईकांना निरोप दिलाच परंतु हा निरोप त्या विमानालासुध्दा होता.