अंमली पदार्थांचा विळखा


मुंबई शहराला अंमली पदार्थांचा फार गंभीर स्वरूपाचा विळखा पडलेला आहे, असे अहवाल प्रसिध्द झालेले आहेत. या अंमली पदार्थांच्या विळख्यात प्रामुख्याने तरुण पिढी आणि त्यातल्या त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी अडकले असल्याचे चिंताजनक निष्कर्ष पोलिसांनी काढले आहेत. सार्‍या जगातच हा चिंतेचा विषय झालेला आहे आणि अनेक देशांची सरकारे या नशिल्या पदार्थांचा वापर आपल्या देशात होऊ नये यासाठी धडपडत आहेत. परंतु आजच्या तरुण पिढीने सरकारच्या अशा प्रयत्नांना शह देऊन आज उपलब्ध असलेल्या सोशल मीडियाचा वापर याही क्षेत्रात सुरू केलेला आहे.

जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून अंमली पदार्थांची मागणी करता येऊ शकते आणि त्यासाठी नवनवे ग्रुप इंटरनेटवर निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे तर अंमली पदार्थांच्या विरोधातील सरकारचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. मुंबई शहरामध्ये तर दर दिवशी २५ लाख रुपयांचे नशिले पदार्थ तस्करीच्या माध्यमातून आणले जातात आणि त्यातला फार कमी माल पकडला जातो असे पोलिसांनीच आपल्या अहवालात कबूल केले आहे. मुंबई शहर हे एक जगडव्याळ शहर आहे. त्या शहराच्या कानाकोपर्‍यात खरोखर कोणकोणते अवैध व्यवहार चालतात याचा पत्ता पोलिसांना लागत नाही. त्यातच अंमली पदार्थांची तस्करी आणि वापर यावर नियंत्रण ठेवणे फारच कठीण आहे. मात्र सरकारने सध्या कसोशीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यातून काही तुलनात्मक आकडे समोर आलेले आहेत.

२०१६ साली पूर्ण वर्षभरात अंमली पदार्थ विरोधी विभागाने एक कोटी ८६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. यावर्षी ही मोहीम अधिक कडक करण्यात आली तेव्हा मात्र चालू वर्षाच्या केवळ चार महिन्यामध्ये ५ कोटी ७४ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले गेले. म्हणजे गतवर्षीच्या वर्षभरातील जप्तीपेक्षा या वर्षातली चार महिन्यातली जप्ती तिपटीहून जास्त आहे. या संबंधात गतवर्षी पूर्ण वर्षभरात १६ जणांना अटक करण्यात आली होती. यावर्षीच्या चार महिन्यात २४ जणांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. हाही आकडा चक्रावून टाकणारा आहे. विशेष म्हणजे अंमली पदार्थ म्हटल्याबरोबर चरस, कोकेन आणि एलएसडी ही नावे समोर येतात. पण आता एमडी नावाचा नवा नशिला पदार्थ समोर आला आहे ज्याचा वापर आता वाढत चाललेला आहे. देशाची तरुण पिढी पोखरली जात आहे.

Leave a Comment