स्वच्छ गावांची चढउतार


भारतातल्या ४३४ शहरांपैकी स्वच्छ शहरांची पाहणी करून त्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. कोणाला कितवा क्रमांक मिळाला याला या क्रमवारीमध्ये महत्त्व आहेच परंतु पहिला क्रमांक कोणाला मिळतो याला नितांत महत्त्व असते आणि हा मान इंदूरने मिळवला आहे. इंदूर हे मध्य प्रदेशातले शहर आहे आणि लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांचा तो लोकसभा मतदारसंघ आहे. त्या गावाला सर्वोच्च पुरस्कार मिळाला ही गोष्ट त्यांच्यादृष्टीने अभिमानाचीच आहे यात काही शंका नाही. परंतु दुसरा क्रमांकसुध्दा मध्य प्रदेशानेच मिळवला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाच्या लोकांना अभिमान वाटणे साहजिक आहे. पहिल्या दहा क्रमांकामध्ये महाराष्ट्राचे केवळ एक शहर आहे. ते म्हणजे नवी मुंबई.

नवी मुंबईचा पहिल्या दहा शहरांमध्ये आठवा क्रमांक आला आहे. ४३४ शहरांपैकी महाराष्ट्रातील ४४ शहरांची पाहणी करण्यात आली होती. त्यातील केवळ दोन शहरे पहिल्या २५ क्रमांकात आली. ही एक प्रकारे महाराष्ट्राची पिछेहाट आहे अशी चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील काही लोकांनी खंत व्यक्त केली आहे. परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ५ शहरांनी पहिल्या १०० शहरात स्थान पटकावले आहे. तर १०० ते २०० या क्रमांकामध्ये १६ तर २०० ते ३०० या क्रमांकात १२ शहरे समाविष्ट झाली आहेत. अशा प्रकारची स्पर्धा २०१६ साली पहिल्यांदा घेण्यात आली होती आणि आता २०१७ चे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे १६ साली कोणते शहर कोठे होते आणि १७ साली त्याचा क्रमांक किती घसरला किंवा किती चढला याची चर्चा सुरू झाली आहे.

२०१६ साली इंदूर २५ व्या क्रमांकावर होते. पण आता ते पहिल्या क्रमांकावर आले आहे. अशीच अनेक शहरांच्या बाबतीत चढउतार झालेली आहे. ज्या शहरांचे नंबर घसरले ती शहरे पूर्वी स्वच्छ होती पण २०१७ साली ती पुन्हा घाण झाली असे तर काही म्हणता येत नाही. मात्र दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या स्पर्धेमध्ये शहर स्वच्छ असण्या बरोबरच लोकांचे मतही विचारात घेतले गेलेले आहे. ज्या शहरातल्या लोकांनी या प्रक्रियेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला त्या शहरांचे क्रमांक वर आलेले आहेत. मात्र त्याबरोबर यावेळी स्पर्धेत सहभागी असलेल्या शहरांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे साहजिकच काही शहरांचे क्र्रमांक आपोआपच खाली गेलेले आहेत. मात्र या शहरांमध्ये भारताची ६० टक्के लोकसंख्या राहते आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या वसाहतींना स्वच्छतेचे वेध लागले आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे.

Leave a Comment