पुस्तकाचे गाव


अखेर महाराष्ट्र शासनाचा एक चांगला उपक्रम कालपासून सत्यात उतरला. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री झाले. ते स्वतः साहित्यिक होते आणि रसिक होते. त्यांच्या दूरदृष्टी होती आणि त्यांना समाजातील साहित्य, संस्कृती, संगीत, कला यांच्या परिणामांची चांगली जाणीव होती. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अगदी अल्प काळातच महाराष्ट्र शासनाचे साहित्य आणि संस्कृतीच्या संबंधातील अनेक उपक्रम सुरू झाले. त्यानंतर महाराष्ट्राला १४ मुख्यमंत्री लाभले. परंतु संस्कृतीच्या क्षेत्रात यशवंतराव चव्हाण यांच्या तोडीचे काम अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केले नाही. आता त्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला पुस्तकाचे गाव हा उपक्रम.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने महाबळेश्‍वर आणि वाईच्या जवळ असलेल्या भिलार या गावामध्ये हा उपक्रम साकार केला आहे. भिलार हे गाव यापुढे पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाईल. तिथल्या २५ घरांमध्ये सुमारे १५ हजार पुस्तकांच्या लाखो प्रती ठेवल्या जातील. महाबळेश्‍वराच्या परिसरातील हे गाव स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून ओळखले जात होते पण आता ते पुस्तकांचेही गाव झाले आहे. महाबळेश्‍वरला येणारे पर्यटक नकळतपणे का होईना पण भिलारला येतील आणि त्यांचे काही क्षण पुस्तकांच्या सान्निध्यात जातील. म्हणजे पर्यटनाबरोबरच पुस्तकांच्याही विक्रीला चांगली चालना मिळून संस्कृतीच्या संवर्धनाच्या दृष्टीने एक पाऊल पडेल.

भिलार या गावाचे पुस्तकाचे गाव म्हणून उद्घाटन करताना त्या गावातील २५ घरे दाखवणारा एक मोठा नकाशा लावण्यात आला होता आणि ज्या घरात पुस्तके आहेत त्या घराच्या बाहेरच्या भिंतीवर पुस्तकांची आणि इतरही चित्रे काढून सजावट करण्यात आली होती. आता यापुढे मराठीत प्रकाशित होणारे प्रत्येक पुस्तक भिलारला पाठवलेच पाहिजे असा संकेत रूढ झाला पाहिजे. या गावातील सगळेच लोक काही सुशिक्षित नाहीत. त्यांनासुध्दा पुस्तकांचा गंध आणि सहवास प्रथमच अनुभवायला मिळत होता आणि या पुस्तकांमुळे भिलारच्या जीवनात मोठे परिवर्तन येईल अशी आशा त्यांना वाटत होती. उद्घाटनाच्या दिवशीच पुस्तकाचा हा परिणाम भिलारच्या लोकांच्या चेहर्‍यावर वाचता येईल इतका ठळकपणे उमटलेला होता. हाच संस्कार सार्‍या महाराष्ट्रावर घडवण्यासाठी भिलार हे सांस्कृतिक केंद्र ठरेल अशी आशा व्यक्त करायला काही हरकत नाही.

Leave a Comment