क्रूरकर्म्यांना फाशी


२०१२ साली देशभरात ज्याचा गवगवा झाला त्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चौघा आरोपींना फाशीच दिली पाहिजे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या संबंधात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातला एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावर सर्वसाधारण न्यायालयात खटला भरण्यात आला नाही. बालगुन्हेगारांवरील आरोपांची सुनावणी करणार्‍या बालन्यायालयात त्याच्यावर खटला चालवून त्याला तीन वर्षे रिमांड होममध्ये राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली. निर्भया प्रकरण दिल्लीत घडल्यामुळे आणि त्यातील आरोपींनी क्रौर्याने परिसीमा गाठल्यामुळे बरेच गाजले होते. देशभर त्याचे पडसाद उमटले आणि दिल्लीत मंत्र्यांच्या आणि पंतप्रधानांच्या घरासमोर लोकांनी निदर्शने केली. देशभरात अनेक ठिकाणी त्यांची पुनरावृत्ती झाली. जनतेचा संताप एवढा पराकोटीला गेला होता की या प्रकरणाच्या निमित्ताने बलात्काराच्या संबंधातील कायद्यामध्ये बदल करण्यात आला. त्याच बरोबर अल्पवयीन गुन्हेगाराची व्याख्या काय असावी यावरही बरीच चर्चा होऊन बालगुन्हेगाराशी संबंधित कायद्यांमध्ये सुध्दा बदल करण्यात आला.

बलात्काराच्या घटना देशात नित्य घडत असतात. विशेषतः ग्रामीण भागामध्ये गरीब आणि दलित महिलांना धनदांडग्या आणि जातदांडग्या धटिंगणांच्या कामवासनेला नित्य बळी पडावे लागते. देशातल्या बलात्काराच्या कित्येक घटना नोंदल्याच जात नाहीत. कारण गुन्हा नोंदल्यापासून न्याय देईपर्यंतच्या सगळ्या यंत्रणांमध्ये पुरुषच महत्त्वाच्या जागांवर बसलेले आहेत आणि ते महिलांवरच्या अशा अत्याचाराच्या प्रकरणात म्हणावी तेवढी सहानुभूती दाखवत नाहीत. परिणामी महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराच्या संबंधात दाद मागण्यास धजावत नाही. आपल्या समाजामध्ये स्त्रियांच्या संबंधात म्हणावी तेवढी संवेदनशीलता नाही. त्यामुळे समाज अत्याचारित महिलेच्या मदतीला धावून येत नाही. उलट जिच्यावर अत्याचार झाला असेल तिलाच दोषी ठरवण्याकडे लोकांचा कल असतो. म्हणूनच महिलांच्या अत्याचाराची अनेक प्रकरणे उघड होत नाहीत. या संबंधात कायदाही म्हणावा तेवढा कठोर नव्हता. त्यामुळे बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली जावी अशी जोरदार मागणी देशातून होत होती. तिला पुन्हा एकदा निर्भयाच्या प्रकरणाने गती मिळाली. कायद्यात काही बाबतीत बदल झाला. आपल्या देशामध्ये खुनाच्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा साधारणतः िदली जात नाही. परंतु बलात्कार करून खून केला असल्यास फाशीची शिक्षा द्यावी असा बदल करण्यात आला.

या प्रकरणातील आरोपींमुळे हा बदल झाला असला तरी त्याची अंमलबजावणी त्यांच्याबाबतीत झाली नाही. कारण त्यांनी केलेला गुन्हा कायद्यात बदल होण्याच्या आधी झाला होता. तरीसुध्दा त्यांना फाशी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याची कारणमीमांसाही केली. कायद्यात बदल होण्याच्यापूर्वी दुर्मिळातल्या दुर्मिळ घटनेमध्ये आरोपींचा निर्दयपणा ठळकपणे व्यक्त झाला असेल आणि त्यांनी केलेले कृत्य घृणित असेल तर जुन्याच कायद्यानेसुध्दा आरोपीला फाशी सुनावली जाऊ शकते आणि त्याच आधारावर या चौघांना फाशीची शिक्षा झालेली आहे. या प्रकरणातला अल्पवयीन आरोपी हा गुन्हा घडला तेव्हा १७ वर्षांचा होता. म्हणजे तो अज्ञान होता. त्यामुळे त्याला कायद्याची सवलत मिळाली. तो आणखीन एक वर्षाने मोठा असता तर त्याला फाशीचीच शिक्षा मिळाली असती. परंतु केवळ तांत्रिक कारणावरून त्याची फाशी टळली आणि तीन वर्षे सुधारगृहात राहण्याची शिक्षा त्याला झाली. याही आरोपीच्या निमित्ताने अल्पवयीन आरोपीच्या व्याख्येमध्ये कायद्यात बदल झाले.

१८ वर्षाच्या आतील आरोपी हे अज्ञान असल्यामुळे आपल्या कृत्याचे परिणाम त्यांना कळत नसतात त्यामुळे त्यांना सर्वसाधारण आरोपीप्रमाणे खटल्याला तोंड द्यावे लागत नाही. मात्र जनतेतून ही व्याख्या बदलण्याची मागणी करण्यात आली आणि ती मान्य करून सरकारने ही अट शिथिल केली. १८ वर्षाच्या आतील आरोपीने केलेले कृत्य कोणत्या प्रकारचे आणि किती गंभीर आहे याचा विचार करून त्याच्यावर खटला भरण्याबाबत विचार केला जावा असा कायद्यात बदल झाला. निव्वळ तांत्रिक कारणावरून आणि १८ वे वर्ष लागायला केवळ काही महिने बाकी आहेत म्हणून खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला सूट मिळता कामा नये ही मागणी मान्य झाली मात्र या अल्पवयीन आरोपीच्या सुदैवाने कायद्यातला हा बदल त्याला लागू झाला नाही. कारण हा बदल त्याच्या गुन्ह्यानंतर झालेला होता. काही असले तरी निर्भया प्रकरणामुळे इतिहास घडला आणि देशामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या संदर्भात लोकांमध्ये मोठी जागृती झाली. ही गोष्ट नाकारता येत नाही. या प्रकरणातील आरोपींना सत्र न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि ती सर्वोच्च न्यायालयातसुध्दा कायम राहिली. या सहा पैकी एका आरोपीने फाशीची शिक्षा सुनावली जाण्याची वाट न पाहता तुरुंगात स्वतःच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कायद्याने नव्हे पण त्याने स्वतःच स्वतःला न्याय दिला होता.

Leave a Comment