बिल्कीस बानोला न्याय


२००२ साली गोध्रा येथे झालेल्या कारसेवकांच्या जळीतकांडानंतर गुजरातमध्ये उद्भवलेल्या भीषण जातीय दंगलींमध्ये सर्वाधिक घृणास्पद समजल्या गेलेल्या बलात्कार आणि हत्याकांडात बळी पडलेल्या बिल्कीस बानो या तरुणीला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने न्याय दिला असून या प्रकरणातील ११ आरोपींची जन्मठेप कायम केली आहे. सत्र न्यायालयात या ११ जणांना जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली होती. मात्र या आरोपींनी या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आपली शिक्षा रद्द व्हावी अशी मागणी केली. उच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली आणि त्यांच्या शिक्षा कायम केल्या. सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणात १९ जणांविरुध्द खटला दाखल करण्यात आला होता. त्यातला एक आरोपी सुनावणी सुरू असतानाच मरण पावला. उरलेल्या १८ जणांमध्ये ११ जणांना शिक्षा आणि ७ जण निर्दोष असा निकाल सत्र न्यायालयाने दिला होता. उच्च न्यायालयाने यातल्या ११ जणांची शिक्षा तर कायम केलीच पण निर्दोष सुटलेल्या ७ जणांच्याबाबतीत सत्र न्यायालयाने दिलेला निकाल रद्द केला आणि त्यांना दोषी ठरवले.

या सात जणांना कमी शिक्षा झाल्या होत्या. कारण ते प्रत्यक्षात आरोपी नव्हते. त्यात एक डॉक्टर आणि एक पोलीस अधिकारी आहे. त्यांनी स्वतःचे कर्तव्य तर केलेच नाही परंतु बलात्कार प्रकरणातील आरोपींना अप्रत्यक्षपणे मदत केली. म्हणून त्यांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सीबीआयने या सर्वांवर खटले दाखल केले होते. कारण स्थानिक पोलिसांनी हे खटले नोंदवून घेण्याच्या बाबतीत टाळाटाळ केली होती. गुजरातेत दंगली पेटल्या तेव्हा बिल्कीस बानो हिचे कुटुंब आणि अन्य शेजारी असे जवळपास १७ जण दंगलीचा उपद्रव टाळण्यासाठी म्हणून एका मालमोटारीतून पळून जात होते. मात्र दंगलखोरांनी त्यांची मालमोटार अडवली. बिल्कीस बानो हिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मालमोटारीवर हल्ला करणारे दंगलखोर हे शस्त्रसज्ज होते. त्यांनी या पळून जाणार्‍या जमावातील १४ जणांच्या हत्या केल्या. बलात्कार झालेली बिल्कीस बानो ही सदर घटना घडली तेव्हा ५ महिन्यांची गरोदर होती. मात्र तिच्यावर बलात्कार करणार्‍या आरोपींना तिची दया आली नाही. या घटनेत विशेष करून तिघांचा जास्त पुढाकार होता. त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावावी अशी मागणी सीबीआयने केली होती. कारण या प्रकरणात बलात्कार आणि हत्या असे दोन गुन्हे गुंतलेले आहेत.

सीबीआयची ही मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली नाही आणि ११ जणांना जन्मठेपेची सजा सुनावल्या. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीमध्ये गुलमर्ग सोसायटी प्रकरण, नरोदा पाटिया हत्याकांड, बेस्ट बेकरी हत्याकांड आणि बिल्कीस बानो बलात्कार हत्या प्रकरण ही चार प्रकरणे फार गाजलेली होती. गुलमर्ग सोसायटीच्या प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले आणि बेस्ट बेकरी प्रकरणातसुध्दा काही आरोपी निर्दोष आणि काही आरोपी दोषी ठरले. या प्रकरणातही या बेकरीच्या मालकाच्या कुटुंबातील ११ जण आणि ३ हिंदू कामगार अशा १४ जणांना जाळून मारण्यात आले होते. नरोदा पाटिया प्रकरणात मात्र मोदी मंत्रिमंडळातील मंत्री माया कोडनानी यांच्यासह काही आरोपींना शिक्षा सुनावल्या गेल्या. बिल्कीस बानोचे प्रकरण मात्र एवढे निघर्र्ृण असूनही ते दाबले जाणार होते. कारण बिल्कीस बानो ही फार गरीब कुटुंबातील महिला आहे त्यामुळे तिची कोणी दखल घेतली नव्हती. या घटनेला आता १५ वर्षे झालेली आहेत आणि घटना घडली तेव्हा बिल्कीस बानो ही १९ वर्षांची होती. एवढ्या तरुण वयातल्या अन्याय पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. परंतु पोलिसांनी तिला हुसकावून लावले.

एवढेच नव्हेतर फिर्याद नोंदण्याचा प्रयत्न केल्यास तिला वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल अशा धमक्याही दिल्या. आरोपींच्या नातेवाईकांनीसुध्दा तिला धमकावले. मात्र तिने धमक्यांना भीक न घालता सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली. शेवटी सर्वोच्च न्यायालयात तिची दखल घेतली गेली आणि न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असा आदेश दिला. सीबीआयने हे प्रकरण तडीस नेले आणि ११ जणांना शिक्षा झाल्या. सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवल्यानंतर सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली तेव्हा तर बिल्कीस बानोला अधिकच धमक्या मिळायला लागल्या. त्यामुळे तिने हे प्रकरण गुजरात बाहेरच्या उच्च न्यायालयात चालवावे अशी मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करून हे प्रकरण मुंबईच्या उच्च न्यायालयात चालवण्याचा आदेश दिला आणि उच्च न्यायालयाने तिला न्याय दिला. गुजरातच्या दंगलीमध्ये अनेक भीषण घटना घडल्या. त्या सगळ्याच घटनांमधील पीडितांना न्याय मिळाला आहेच असे नाही बिल्कीस बानोने मात्र काही मानवाधिकारवादी संघटनांच्या मदतीने न्यायासाठी संघर्ष केला आणि त्यामुळे उच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले. आता आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे जाहीर केले असले तरी तिथेही त्यांच्या शिक्षा कायम होतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment