हुक्कापाणी बंद करा


पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी देशात फार तीव्रतेने केली जात आहे. परंतु पाकिस्तान हे बेधडकपणे अनैतिक कारवाया करणारा देश असल्यामुळे पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यात भारताची सभ्यता आडवी येत आहे. एखाद्या शांत आणि संभावित व्यक्तीला एखाद्या शिवराळ माणसाने वाट्टेल तशा शिव्या दिल्या तर तो संभावित माणूस त्याला तशाच शिव्या देत नाही तर त्याला वेगळ्या प्रकारे ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करतो.

पाकिस्तानने आपल्या दोन जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली म्हणून आपणही त्यांचे दोन जवान मारून किंबहुना त्यापेक्षा जास्त जवान मारून त्यांच्याही मृतदेहाची अशीच विटंबना केली पाहिजे अशी भावना सर्वसाधारण जनतेमध्ये व्यक्त झाली असेल तर ती नैसर्गिक आणि साहजिक आहे. अशा प्रकारे पाकिस्तानचा सूड घेण्याची क्षमता आपल्या जवानांमध्ये आहेच. परंतु एवढी सक्षमता असूनसुध्दा युध्दासंबंधीच्या काही संकेतांचे पालन करण्याएवढी सभ्यता भारतामध्ये आहे आणि पाकिस्तानकडे ती नाही हा मुद्दा भारतासाठी संवेदनशील आहे. असे आहे म्हणून पाकिस्तानला जवाब देऊ नये असे नाही. तो तर जरूर दिला पाहिजे. परंतु सर्वसाधारण भारतीय नागरिकांना ज्या अर्थाने जशास तसे उत्तर अपेक्षित आहे तसे ते देता येत नाही आणि देऊही नये.

तोंड उघडण्यासाठी तोंड नव्हे तर नाक दाबले पाहिजे आणि नाक दाबण्यातच खरा शहाणपणा आहे. यापासून बोध घेऊन भारत सरकारने पाकिस्तानला बंदुकीला बंदुकीने उत्तर न देता बंदुकीचा वापर न करता शरण आणले पाहिजे. असा काही तरी उपाय केला पाहिजे की पाकिस्तानचे जगणे मुश्किल झाले पाहिजे आजचा जमाना हा शस्त्राने युध्द करण्याचा नाही. तर आजचा जमाना हा डॉलरने युध्द करण्याचा आहे. म्हणजे आजच्या काळात लढली जाणारी लढाई ही आर्थिक लढाई असते. भारताने पाकिस्तानशी असलेल्या सगळ्या आर्थिक व्यवहारांवर बहिष्कार टाकावा. भारताने असा बहिष्कार घातला म्हणून पाकिस्तान काही मरणार नाही. परंतु पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहारावर निश्‍चितपणे गंभीर परिणाम निश्‍चितच होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे आणि पाकिस्तानची शेती ज्या पाण्यावर पिकते ते सिंधू नदीचे पाणी भारतातून पाकिस्तानला जाते. सिंधू नदीचा उगम लेहमध्ये आहे आणि १९५० साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत एक करार झालेला आहे. त्या कराराची मुुदत संपलेली आहे. तेव्हा भारताने सिंधू नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी अडवले पाहिजे आणि पाकिस्तानला शरण आणले पाहिजे.

Leave a Comment