भारताची स्पेस डिप्लोमसी


भारताने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात जगात आघाडी घेतली आहे. या क्षेत्रातील कामगिरीमध्ये रशिया, अमेरिका, चीन, जपान, यूरोपीयन स्पेस एजन्सी यांच्या बरोबरीने भारताचे नाव घेतले जात आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या बौध्दिक पराक्रमामुळे साध्य झालेल्या या यशाचा जागतिक राजकारणासाठी काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे. ही कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. अन्यथा अंतराळ संशोधनातील हे यश केवळ व्यावसायिक कामासाठीच वापरण्याची कल्पना होती. भारताचे अंतराळ संशोधक उपग्रहांचे प्रक्षेपण अचूकपणे करण्यात वाकब्गार आहेत. त्यामुळे प्रक्षेपणाचाच व्यवसाय करावा असे ठरलेले आहे. परंतु या क्षमतेचा वापर आंतरराष्ट्रीय राजकारणातही करता येऊ शकतो.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर ही कल्पना मांडली. भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘सार्क’ म्हणजे दक्षिण आशियायी सहकार सहकार संघटना. या संघटनेतील अन्य छोट्या देशांना भारताच्या या कौशल्याचा लाभ झाला पाहिजे असे मोदींचे म्हणणे होते. त्यांनी दिलेल्या या संकेताचा पाठपुरावा करत भारतीय अंतराळ संशोधक संघटनेने एक विशेष उपग्रह विकसित केला आहे. साऊथ एशियन सॅटेलाईट असे या उपग्रहाचे नाव आहे. हा उपग्र्रह येत्या ५ तारखेला अंतराळात प्रक्षेपित केला जाणार आहे. २३५ कोटी रुपये खर्चुन हा सव्वा दोन टन वजनाचा उपग्रह तयार करण्यात आला असून तो दक्षिण आशियातील नेपाळ, भूटान, श्रीलंका, बांगला देश, अफगणिस्तान आणि मालदीव या छोट्या देशांना उपयुक्त ठरणार आहे.

या उपग्रहाचे नाव सार्क उपग्रह असे ठेवण्यात आले होते. परंतु पाकिस्तानने त्याला नाट लावला. आपण या उपग्रहाच्या योजनेत सहभागी नसल्याचे पाकने जाहीर केले. त्यामुळे हा उपग्रह आता दक्षिण आशियाई सॅटेलाईट म्हणून ओळखला जाणार आहे. सार्क ही संघटना इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात आता महाशक्ती कोणी उरणार नाही आणि विविध देशांच्या विभागीय संघटना याच आता या राजकारणात निर्णायक भूमिका निभावतील या कल्पनेतून ही संघटना स्थापन झाली. दक्षिण आशियातला सर्वात मोठा देश हे भारताचे या संघटनेतले स्थान आहे. ते अधिक बळकट करायचे असेल तर, सबका साथ सबका विकास हे धोरण समोर ठेवून भारताने या छोट्या देशांना मदत आणि मार्गदर्शन केले पाहिजे, ही भूमिका नरेंद्र मोदी यांनी घेतली आणि तिचाच आविष्कार म्हणून हा उपग्रह आता अवकाशत सोडला जाणार आहे.

Leave a Comment