खराब नोटा स्विकारण्यास बँका नकार देऊ शकत नाहीत – आरबीआय


मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने खराब झालेल्या किंवा लिहिलेल्या नोटा स्विकारण्यास बँका नकार देऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अशा नोटांना बाद झालेल्या नोटा ग्राह्य न धरता यावर तोडगा काढावा असेही आरबीआयने सांगितले आहे. गेल्या काही दिवसांत बँका रंग लागलेल्या तसेच ज्यांच्यावर काही लिहिले आहे, धुतल्याने रंग उडाला आहे अशा नोटा स्विकारत नसल्याच्या तक्रारी रिझर्व्ह बँकेकडे येत होत्या. यामध्ये खासकरुन ५०० आणि २०००च्या नोटांचा समावेश होता. यानंतर आरबीआयने परिपत्रक काढत बँकांना या नोटा स्विकारण्याचा आदेश दिला आहे.

अशा नोटा बँका स्विकारणार नसल्याची अफवा सोशल मीडियावर परसली होती. आठमुठेपणा दाखवत बँकांही नोटा स्विकारण्यास नकार देऊ लागल्या होत्या. आरबीआयने अफवा वेगाने पसरु लागल्यानंतर दखल घेत आपल्या २०१३ मधील आदेशाची आठवण करुन दिली. खराब नोटा स्विकारण्यासंबंधी आपण कोणताच आदेश दिला नसल्याचे आरबीआयने त्यावेळी सांगितले होते.

त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, जो आदेश नोटांवर लिहिण्यासंबंधी देण्यात आला होता तो बँक कर्मचा-यांसाठी होता. नोटांवर त्यांनी काही लिहू नये असे सांगितले होते. अनेक बँक कर्मचा-यांना नोटांवर लिहिण्याची सवय लागल्याचे लक्षात आल्यानंतर आरबीआयने हा आदेश काढला होता. अशाप्रकारे नोटांवर लिहिणे आरबीआयच्या क्लीन नोट पॉलिसीविरोधात आहेत. आरबीआयने सरकारी कर्मचारी, संस्था आणि सामान्यांना नोटांवर काही न लिहिता त्यांना व्यवस्थित ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment