देशातील काही मंदिरात आहेत दलित पुजारी


आपल्या कित्येकांचा आजही असा समज आहे की, ब्राम्हण हेच मंदिरात पुजारी असतात. पण सुरूवातीपासूनच देशात कर्मावरून वर्णव्यवस्था निर्माण झाली. जे काम ज्याचे होते त्यावरून त्याचा वर्ण ठरत असे. रक्षण करण्याचे कार्य क्षत्रिय समाज करीत असत. व्यापाराचा व्यवसाय वैश्य करीत असत तसेच पूजा करण्याचे काम केवळ ब्राह्मणांनीच करायचे. पण तो काळ बदलला तसे लोकांचे व्यवसाय सुद्धा बदलले. पूर्वी सारख्या लोकांना अमुक एकच व्यवसाय करावा अशी मर्यादा आता नाही. प्रत्येकाला आवडेल ते काम करण्याची मुभा आता आहे. तरीही आजही बऱ्याचशा देवळांमध्ये पूजेचे काम ब्राह्मणाकडे दिलेले असते. पण देशात अशीही काही मंदिरे आहेत जिथे ब्राह्मण पुजारी नसून दुसऱ्या समाजाचे पुजारी आहेत.

देवावर कोणा एकाचाच अधिकार नाही. देव सगळ्यांचा आहे. म्हणूनच देवाची पूजा करण्याच्या अधिकार प्रत्येक माणसाला आहे, असे म्हणतात. मात्र आजही आपल्या देशात अशा घटना ऐकायला मिळतात की एखाद्या व्यक्तीला देवळात पूजेचा हक्क नाही किंवा देवळात प्रवेश नाही. पूर्वीपासूनच अशी शिकवण आपल्या संतमंडळींनी दिली आहे की माणसाने कुठल्याही प्रकारचा भेदभाव माणसाशी करू नये. प्रत्येकाशी प्रेमाने व माणूसकीनेच वागावे. काही लोक आजही हे मानत नाहीत व दुसऱ्याला कनिष्ठ समजून वाईट वागणूक देतात. परंतु हळू हळू हे प्रमाण कमी होते आहे. लोक हे स्विकारत आहेत की प्रत्येकाला देवाशी जोडल्या जाण्याचा व देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. म्हणूनच भारतात अशीही काही मंदिरे आहेत जिथे पुजारी हे ब्राह्मण समाजाचे नसून दुसऱ्या समाजाचे आहेत.

देवभूमी उत्तराखंड मध्ये एक मंदिर असे आहे जिथे ब्राह्मण किंवा क्षत्रिय पुजारी नसून अनुसूचित जातीचे आहेत. हे देऊळ चार धामांपैकी एक बद्रीनाथ-कर्णप्रयाग पासून फक्त ३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. ‘कालेश्वर भैरव मंदिर’म्हणून हे देऊळ प्रसिद्ध आहे. पण स्थानिक ह्या मंदिराला ‘काल्दू भैरव मंदिर’ असे म्हणतात. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे बद्रीनाथ धाम येथे जी रोज आरती गायली जाते ती कुणा हिंदू भक्ताने रचलेली नसून प्रयाग येथील बदरुद्दीन ह्यांनी लिहिली आहे. बदरुद्दीन हे मुस्लीम धर्माचे आहेत. त्यांनी हि आरती रचली जी आजही बद्रीनाथ येथे नित्यनेमाने भक्तिभावाने गायली जाते.

झारखंड येथे सुद्धा असेच एक देऊळ आहे जिथे ब्राह्मण किंवा क्षत्रिय नसून पुजारी दलित समाजाचे आहेत. हे मंदिर खरसावा जिल्ह्याच्या कुम्हारसाही येथे आहे. येथील राजांनी प्राचीन काळी हे मंदिर बांधलेले आहे व सुरुवातीपासूनच ह्या देवळात देवीच्या पूजेचा मान दलित समाजाच्या पुजाऱ्यांना आहे. हे देऊळ अत्यंत जागृत देवस्थान आहे. स्थानिकांच्या मते तिथे माता पाउडी देवी विराजमान आहे व तिचा महिमा अपरंपार आहे. म्हणूनच पाउडी देवीचे दर्शन घेण्यासाठी लांबून लांबून लोक येतात. सामान्य लोक तर येतातच परंतु सत्तेवर असणारे ‘सिरमौर’ सुद्धा तिथे न चुकता देवीचे दर्शन घ्यायला येतात. माता पाउडीला भगवती देवीचे रूप मानतात. आणि ह्या शक्ती पीठाचे पुजारी देऊरी दलित समाजाचे लोक आहेत.

आपल्या राज्यातदेखील पंढरपूर आणि तुळजापूर येथील देवळांमध्ये ब्राह्मण पुजारी नसून इतर समाजाचे लोक पुजारी असून या लोकांनीही हे आनंदाने स्वीकारलेले आहे. कारण देवाची भक्ती करण्याचा हक्क सर्वांनाच आहे.

Leave a Comment