१९८० च्या दशकापासून पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणत आहे. पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष झियाउल हक यांनी या कारवायांना प्रारंभ केला. भारताशी समोरासमोर युध्द झाल्यास आपला टिकाव लागणार नाही याची खात्री पटल्यानंतर त्यांनी भारतावर हे छुपे युध्द लादले. भारतातल्या काही लोकांना असे वाटते की भारतानेसुध्दा पाकिस्तानात अशाच कारवाया कराव्यात आणि पाकिस्तानला जशाच तसे उत्तर द्यावे. पाकिस्तानी लष्कराची आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा भारतात घातपाती कारवाया घडवते तशा कारवाया भारताच्या रॉ या संघटनेकडून पाकिस्तानात घडवाव्यात आणि पाकिस्तानला त्रस्त करून सोडावे अशी या लोकांची सूचना असते. सकृतदर्शनी ही सूचना योग्य वाटली तरी अशा प्रकारच्या कारवायांमधून शेवटी निष्पन्न काय होणार आहे. यावर विचार केला असता असा निष्कर्ष निघतो की जशाच तशा कारवायांनी उत्तर दिल्यास दोन्ही देशात अशा कारवाया वाढण्याशिवाय अन्य काही निष्पन्न होणार नाही.
पाकिस्तानचा आक्रस्ताळेपणा
दोन्ही देश गरीब आहेत. तेव्हा त्यांनी परस्परांच्या विरुध्द घातपाती कारवाया करण्यापेक्षा परस्परांची गरिबी हटवण्यासाठी एकमेकांन मदत करावी आणि या मदतीची पूर्व अट म्हणून दोन्ही देशांदरम्यान शांततेचे संबंध प्रस्थापित करावेत. पाकिस्तानच्या घातपाती कारवायांना हेच खरे सकारात्मक उत्तर आहे आणि त्यामुळेच भारताच्या कोणत्याही पक्षाच्या राज्यकर्त्यांनी पाकिस्तानात घातपाती कारवाया घडवण्याच्या कल्पनेला कधीच प्रोत्साहन दिले नाही. आपल्या देशाने कितीही समझोत्याचे प्रयत्न केले तरी पाकिस्तानचे शेपूट शेवटी वाकडेच राहिलेले आहे. परंतु भारताच्या संयमपूर्ण प्रतिसादाची आंतरराष्ट्रीय समुदायाने नेहमीच वाखाणणी केलेली आहे आणि त्या उलट पाकिस्तान म्हणजे घातपाती कारवाया करणारे दहशतवादी राष्ट्र आहे. ही पाकिस्तानची प्रतिमा जगभरात निर्माण झाली. तशी ती निर्माण करण्यात भारताने खूप प्रयत्न केले. त्यामुळे आता पाकिस्तानची अवस्था फार वाईट झालेली आहे. जगभर दहशतवादी राष्ट्र म्हणून छीथू होत आहे आणि भारतात केलेल्या कारवायांनी भारताचे त्यांना अपेक्षित एवढे नुकसान होत नाही. पाकिस्तानला अपेक्षित आहे की भारतात घातपाती कारवाया केल्या की त्यातून आपोआपच हिंदू-मुस्लीम दंगली पेटतील आणि देशाच्या एकात्मतेला मोठा धक्का बसेल पण असे घडत नाही. त्यामुळे पाकिस्तान निराश आहे. त्याची प्रतिमाही पूर्णपणे मलीन झालेली आहे.
अमेरिका हा पाकिस्तानचा तारणहार आहे आणि आता अमेरिकेला आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताच्या मैत्रीची गरज आहे. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर उघडपणे टीका करून पाकिस्तानची कोंडी करायला सुरूवात केली आहे. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानने भारत हेसुध्दा दहशतवादीच राष्ट्र आहे अशी भारताची प्रतिमा निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केलेला आहे. भारताने कधीही पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया केलेल्या नाहीत आणि करणारही नाही. परंतु पाकिस्तान मात्र तसे सिध्द करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानच्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातून सातत्याने भारताच्या पाकिस्तानमधल्या कथित दहशतवादी कारवायांची चर्चा घडवली जाते. त्या चर्चांमध्ये सहभागी होणारे सगळे पाकिस्तानी पत्रकार आणि पाकिस्तानी सरकारचे प्रतिनिधी भारतावर घातपाती कारवाया घडवल्याचे बेफाम आरोप करत राहतात. परंतु अशा कारवायांचा एकही पुरावा त्यांन देता येत नाही. त्यामुळे त्यांची अडचण होते. तिच्यावर मात करण्यासाठी त्यांनी इराणमधून व्यापारी हेतूने बलुचिस्तानमधून आलेल्या कुलभूषण जाधव यांना विनाकारण अडकवले आहे.
वास्तविक पाहता पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनांनी बलुचिस्तानमध्ये जाधव यांचे अपहरण केले तेव्हापासून पाकिस्तानी टी.व्ही.वरील चर्चेमध्ये बोलणारा प्रत्येक वक्ता, कुलभूषण जाधव हे तर भारताच्या घातपाती कारवायाचे ठळक उदाहरण आहे अशा शब्दामध्ये या एकाच प्रकरणाचा सतत उल्लेख करत राहतो. जाधव यांना पकडून त्यांचा सातत्याने वापर करण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटलासुध्दा चालवण्याचे नाटक केले. जगातल्या कोणत्याही खटल्यामध्ये आरोपीला वकिल लावण्याचा अधिकार असतो. नैसर्गिक न्यायाने ते खटला चालवणार्यांचे कर्तव्य असते. परंतु जाधव यांना वकिल लावू दिलेला नाही, त्यांचे म्हणणे काय आहे हे ऐकून घेतलेले नाही आणि सरळ त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही तर न्यायाची थट्टा आहे. पण पाकिस्तान आव तर असा आणत आहे की जणू भारताच्या घातपाती कारवायांचे बिंगच फोडले आहे. पाकिस्तानमध्ये न्याय नावाची गोष्ट नाही. ते आपल्या देशातल्या लोकांना न्यायाचे संरक्षण देत नाहीत. ते एखाद्या अशा भारतीयाला काय देणार आहेत. जाधव यांना भरपूर मारहाण करून मला भारताच्या रॉ या संघटनेने पाठवलेले आहे असा कबुली जबाब त्यांच्याकडून लिहून घेतलेला आहे. तेवढा एकच पुरावा वापरून लष्कराने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. सार्या जगामध्ये पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेचे हसे होत आहे.