पत्रकारितेची पातळी


भारत सरकारच्या जाहिराती प्रसिध्द करणे, निरनिराळ्या माध्यमांसाठीचे त्यांचे दर ठरवणे आणि जाहिराती प्रसिध्द होत आहेत की नाही यावर लक्ष ठेवणे हे काम करण्यासाठी डीएव्हीपी हे खाते काम करत आहे. त्याला डायरेक्टोरेट ऑफ ऑडिओ ऍन्ड व्हिज्युअल पब्लिसिटी म्हणजे दृकश्राव्य प्रसिध्दी संचालनालय. बर्‍याचदा दिल्या जाणार्‍या जाहिराती योग्य त्या माध्यमापर्यंत जात आहेत की नाही, ती वृत्तपत्रे प्रसिध्द होत आहेत की नाही आणि त्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे त्यांचे अंक छापले जातात की नाही याची सातत्याने पाहणी करून दिल्या जाणार्‍या माध्यमांची यादी सतत दुरूस्त करत राहणे या खात्याचे काम असते. या खात्याने नुकतीच भारतातील अनेक वृत्तपत्रे या यादीतून काढून टाकली. कारण ती सगळी अपेक्षित असलेल्या नियमांनुसार प्रसिध्द होत नव्हती.

याच यादीमध्ये राष्ट्रधर्म या साप्ताहिकाचाही समावेश झाला आणि या साप्ताहिकाला यापुढे केंद्र सरकारच्या जाहिराती दिल्या जाऊ नयेत असा निर्णय झाला. तसा तो अनेक वृत्तपत्रांच्या बाबतीत झालेला आहे. परंतु एका दैनिकाने राष्ट्रधर्मला दिल्या जाणार्‍या जाहिराती बंद करण्यात आल्या असा केवळ राष्ट्रधर्मचाच उल्लेख बंद करून एक बातमी प्रसिध्द केली. वास्तविक पाहता केवळ राष्ट्रधर्मचा उल्लेख करणे उचित नव्हते. कारण जाहिराती बंद झालेल्या अनेक वृत्तपत्रात त्याचाही समावेश होता. मात्र या वृत्तपत्राचा भंपकपणा असा की त्या साप्ताहिकाचे संपादक म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कधीतरी अल्पकाळ काम केलेले होते. म्हणजे यातून या दैनिकाला वाजपेयींच्या साप्ताहिकाच्या जाहिराती मोदींनी बंद केल्या असे सूचित करायचे होते.

एवढे सूचित करून एवढे दैनिक थांबलेले नाही तर आता राष्ट्रधर्म साप्ताहिकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे अशी पुस्तीही त्याने जोडली. मुळात या साप्ताहिकाचा आता वाजपेयींचे साप्ताहिक असा उल्लेख करणे हेच योग्य नाही आणि तसे असले तरी नियमात बसत नसेल तर त्याच्या जाहिराती बंद केल्या पाहिजेत. यामध्ये काही फार मोठा अन्याय नाही. परंतु केंद्रीय पातळीवर वाजपेयींच्या विरोधात मोदी काहीतरी करत आहेत असे सूचित करण्याचा या मागचा जो प्रयत्न आहे तो चांगल्या पत्रकारितेचा द्योतक नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीएव्हीपीच्या जाहिराती बंद झाल्या म्हणून कोणत्याही दैनिकाचे किंवा साप्ताहिकाचे अस्तित्व धोक्यात येत नसते. त्याच्या एकंदर जाहिरातीच्या उत्पन्नात डीएव्हीपीच्या जाहिरातीचा हिस्सा फार कमी असतो. पण आगलावेपणाची बातमीदारी करण्याची काही लोकांना हौसच असते. त्यांच्या पत्रकारितेचा दर्जा उच्च आणि हेतू सात्विक नसतो.

Leave a Comment