१० मे पासून पेट्रोल पंपचालकांचा ‘नो पर्चेस डे’!


मुंबई – सरकारकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद कमिशन वाढवून देण्याबद्दल न मिळाल्याने पेट्रोल पंप मालकांनी रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याची धमकी दिली आहे. पेट्रोल पंपांकडून सध्याच्या घडीला कोणतीही सुट्टी घेतली जात नाही. मात्र केंद्र सरकारकडून कमिशन वाढवून दिले जात नसल्याने रविवारी साप्ताहिक सुट्टी घेण्याचा इशारा देशभरातील पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे.

देशभरातील पेट्रोल पंप मालकांनी १० मे हा दिवस ‘नो पर्चेस डे’ असेल, असा इशारा दिल्यामुळे या दिवशी पेट्रोलची खरेदी केली जाणार नाही, असे पेट्रोल पंप मालकांनी म्हटल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिली आहे. जानेवारी महिन्यातच पेट्रोल पंप मालकांकडून पीएसयू संस्थांकडून मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र कमिशन वाढवून देण्याबद्दलचे आश्वासन केंद्राकडून देण्यात आल्यानंतर पेट्रोल पंप मालकांकडून संप मागे घेण्यात आला. मात्र त्यानंतर अद्यापही पेट्रोल पंप मालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.

कमिशनमध्ये वाढ न केल्यास १० मे रोजी पेट्रोल आणि डिझेलची खरेदी केली जाणार नाही, असा इशारा पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे. १० मे रोजी पेट्रोल पंप मालकांनी इंधन खरेदी न केल्सास त्याची झळ सर्वसामान्यांना १४ मे रोजी बसेल. १४ मे रोजी रविवार असल्याने पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येईल आणि यानंतरच्या प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद असतील.

१५ मे पासून (सोमवारी) पेट्रोल पंप फक्त एकाच शिफ्टमध्ये (सकाळी ९ ते संध्याकाळी ६) सुरु असतील. जोपर्यंत नुकसान भरुन निघत नाही आणि पेट्रोल पंप व्यवसाय फायदेशीर ठरत नाही, तोपर्यंत पेट्रोल पंप फक्त एकाच शिफ्टमध्ये सुरु असतील, असे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment