बीएसएनएल, एअरटेल नोकियाच्या मदतीने ‘५जी’ क्षेत्रात करणार क्रांती


मुंबई : आपापल्या नेटवर्कना भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारती एअरटेल या दोन भारतीय टेलिकॉम कंपन्या ५जी मध्ये बदलणार आहेत. नोकिया ही मोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी बीएसएनएल आणि एअरटेलला यासाठी मदत करणार आहे. त्यासंदर्भात एअरटेल आणि बीएसएनएलने नोकियासोबत सामंजस्य करारही केला आहे.

भारतात ५जी नेटवर्क आणणे, हेच या सामंजस्य कराराचे ध्येय असून कोणत्या गोष्टींची या कामासाठी गरज आहे, ते पाहू. ५जी नेटवर्कच्या दिशेने ही सुरुवात आहे, असे नोकियाचे भारतातील मार्केटिंग हेड संजय मलिक यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात २०१९-२०२०दरम्यान व्यावसायिक हेतूसाठी ५जी नेटवर्कचे लॉन्चिंग केले जाऊ शकते. यासाठी भारतात फिल्ड-कंटेट आणि अॅप्लिकेशन या गोष्टींची चाचणी २०१८पासूनच केली जाईल.

नोकिया आधीपासूनच एअरटेलला ९ सर्कलसाठी ४जी इक्विपमेंट पुरवते. त्यामध्ये गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश पूर्व, मुंबई, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिसा, पंजाब आणि केरळ या ९ सर्कलचा समावेश आहे. त्यामुळे नोकियाचे एअरटेलसोबत काम करणे, यात नवीन नसेल. बंगळुरुमधील आपल्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटरमध्ये ५जी नेटवर्क काय असेल, त्याचे काम कसे चालेल, कोणत्या गोष्टी त्यासाठी आवश्यक आहेत इत्यादी माहितीसाठी नोकिया एक्स्पीरियन्स सेंटर सुरु केले जाणार आहे.

नोकियाच्या अमित मारवाह यांच्या म्हणण्यानुसार, जगात २जी नेटवर्क विकसित होण्यासाठी जवळपास १० वर्षे लागली. त्यानंतर ३ जी आणि ४ जी नेटवर्कसाठी त्याहून कमी वेळ लागला. तंत्रज्ञानामध्ये भारत इतर देशांच्या तुलनेत तोडीस तोड आहे. एककीडे नोकियाच्या मदतीने बीएसएनएल आणि भारती एअरटेल ५जी नेटवर्कसाठी तयारी करत असताना, दुसरीकडे सॅमसंग आणि रिलायन्स जिओ ५जी नेटवर्कसाठी पार्टनरशिप करणार असल्याचे यंदाच मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमधून समोर आल्यामुळे ५जी नेटवर्कसाठी आगामी काळात भारतात मोठी स्पर्धा सुरु होईल, यात शंका नाही.

Leave a Comment