आता द्या नोटाबंदीच्या काळात जमा केलेल्या रक्कमेची माहिती


नवी दिल्ली – नोटाबंदीच्या काळात बँकेत जमा करण्यात आलेल्या रकमेची माहिती नवे प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करताना आता तुम्हाला द्यावी लागणार आहे. २०१७-१८ साठी नवे विवरण पत्र उपलब्ध असेल. ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या नोटाबंदीच्या काळात कर विभागात गतवर्षी एखादी व्यक्ती किंवा संस्थेकडून बँकेत जमा करण्यात आलेल्या रकमेची माहिती देण्यासाठी एक नवा रकाना तयार करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पगारदार व्यक्तींसाठी नवा रकाना हा आयटीआर-१ किंवा सहज अर्जही जोडण्यात येणार आहे. नोटाबंदीच्या काळात अघोषित संपत्तीची माहिती देण्यासाठी प्राप्तिकर विभागाने ‘ऑपरेशन क्लीन मनी’ आणि ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ (पीएमजीकेवाय) संधी दिली होती. आता विवरण पत्राच्या नव्या रकान्याच्या माध्यमातून बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटासंबंधी माहिती घेण्यात येणार आहे.

किती रक्कम नोटाबंदीच्या काळात भरण्यात आली होती, हे या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यांनी कमी रक्कम भरली आहे, त्यांना नोटीस बजावण्यात आली नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नव्या विवरण पत्रात आधार क्रमांक देण्यासाठीही रकाना असणार आहे. गतवर्षी आधार क्रमांक देणे एच्छिक होते. या वर्षी मात्र बंधनकारक करण्यात आले आहे. आधारच्या वापरामुळे विवरण पत्राचे इ-व्हेरिफिकेशन जारी राहते, असेही या अधिकाऱ्याने म्हटले.

करदात्यांसाठी आयटीआर-१ किंवा ‘सहज’ अर्जाची रचना सोपी बनवली असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये सर्व वजावट, संपत्ती आणि देणे याबाबत माहिती भरण्यासाठी सर्व रकाने एकत्रित करण्यात आले आहेत. आयटीआर अर्ज १ एप्रिलपर्यंत जारी होण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर विभागात नऊ वेगवेगळे आयटीआर अर्ज एकत्रित जारी केली जाण्याची शक्यता आहे. करदात्यांसाठी ३१ जुलैपर्यंत विवरणपत्र भरता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Comment