अरे बापरे… छान पाऊस!


दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आगामी पावसाळ्याचे भाकीत करणारा अहवाल हवामान खात्याने जारी केला आहे आणि चालू वर्षाप्रमाणेच पुढचा पावसाळासुध्दा सामान्य असेल, चांगला पाऊस पडेल असे अंदाज व्यक्त केले आहेत. दरवर्षी केवळ भारतच नव्हे तर जगाच्या फार मोठ्या भागात पावसाविषयीच्या अनिश्‍चिततेने लोकांना अस्वस्थ केलेले असते. विशेषतः पॅसिफिक महासागरात निर्माण होणारा अलनिनो हा उष्ण पाण्याचा प्रवाह पावसाळ्यावर काय परिणाम करील या विषयी सर्वांना चिंता वाटत असते. मात्र आताच वर्तवण्यात आलेल्या भाकितात या उष्ण प्रवाहाचा कसलाही दुष्परिणाम पावसाळ्यावर होणार नाही असा दिलासा हवामान तज्ञांनी दिला आहे. हवामान खात्याचे अंदाज हा तसा काही लोकांसाठी कुचेष्टेचा विषय असतो. परंतु गतवर्षीच्या मार्च महिन्यात अशाच प्रकारे अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि तो या वर्षी खरा ठरला आहे. पाऊस छान पडला की पाण्याची टंचाई जाणवत नाही आणि त्यामुळे पावसाविषयीचे असे भाकीत वर्तवले गेले की लोकांना आनंद होतो.

असे असले तरी पावसाच्या अंदाजाने शेतकरी वर्ग काही आनंदी होईल अशी परिस्थिती दिसत नाही. पाणी टंचाईची भीती शेतकर्‍यांनाही वाटत असतेच आणि त्यामुळे सर्वसामान्य बिगर शेतकरी वर्गाप्रमाणे शेतकर्‍यांनासुध्दा पावसाच्या अनुकूल भाकितामुळे आनंद होत असणार यात काही शंका नाही. परंतु फार कमी शेतकरी पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले दिसतात. कारण भरपूर पाऊस पडेल आणि पीकपाणी छान होईल यामुळे शेतकर्‍याला आनंद होण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. कारण शेतकर्‍यांसाठीची अर्थव्यवस्था अशी काही विचित्र झालेली आहे की भरपूर धान्य पिकले तरी त्याच्यापुढे अडचणीच आहेत आणि कमी धान्य पिकले तरी त्याच्यापुढे संकटेच उभी असताना दिसत आहेत. गतवर्षी छान पाऊस पडला. विशेषतः तुरी, सोयाबीन आणि कापूस ही महाराष्ट्रातली तीन मुख्य पिके वरुणराजाच्या कृपेने भरमसाठी पिकली. सुदैवाने यावर्षी या पिकांवर कसली रोगराई पडली नाही. त्यामुळे तर शेतकर्‍यांच्या खळ्यामध्ये मालाच्या राशी लागल्या. उत्पादनाच्या अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये असे भरपूर उत्पन्न झाले की उत्पादकाला आनंद होतो. कारण उत्पादन वाढले की त्याला मिळणारे पैसेसुध्दा वाढतात. परंतु शेतकर्‍यांची स्थिती मात्र उलट आहे. त्यांनी कष्ट करून आणि निसर्गाची कृपा होऊन धान्य भरपूर पिकले की धान्याच्या किंमती कोसळतात.

उत्पादनाच्या अन्य क्षेत्रामध्ये वाढलेल्या उत्पादनाबरोबर उत्पादकाचे उत्पन्नही वाढत असल्यामुळे सरकार त्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देते. पण शेतीत मात्र जास्त उत्पादन झाले की भाव पडून शेतकरी एवढा नागवला जातो की कष्ट करून अधिक धान्य पिकवल्याचा त्याला पश्‍चात्ताप होतो. त्याने पाच क्विंटल धान्य पिकवले तर ८०० च्या भावाने त्याला ४ हजार रुपये मिळतात. पण त्याने कष्ट करून ५ च्या ऐवजी ८ क्विंटल माल पिकवला तर त्याला वाढलेल्या उत्पन्नामुळे ८०० च्या भावाने ६४०० रुपये मिळाले पाहिजेत आणि त्याच्या कष्टाचे चीज झाले पाहिजे परंतु बाजारात जास्त मालाची आवक झाली की एरवीचा ८०० रुपयांचा भाव ५०० रुपयांपर्यंत खाली कोसळतो आणि त्याला पहिल्या प्रमाणेच ४ हजार रुपये मिळायचे तेवढेच मिळतात. त्यामुळे चांगला पाऊस पडणार, माल जास्त वाढणार असा कोणीही अंदाज व्यक्त केला तरी शेतकर्‍याला काही आनंद होत नाही. उलट जादा उत्पादन ही आपल्याला कशी शिक्षा असते. याचा अनुभव त्याला नेहमी येतच असतो. म्हणून चांगला पाऊस पडणार म्हणताच त्याच्या काळजात धस्स होते.

अधिक मालाची निर्मिती झाली की भाव कोसळतात म्हणजे नेमके काय होते? तुरीचेच उदाहरण घेऊया. आता तुरी बाजारात भरपूर आलेल्या आहेत. त्यामुळे भाव कोसळला आहे. सरकार ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भावाने तुरी खरेदी करते म्हणून बरे आहे. पण सरकारची खरेदी नसती तर यंदा तुरीचा भाव २ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला असता आणि व्यापार्‍यांनीसुध्दा आवक वाढली, आवक वाढली असा आरडाओरडा करून तुरी मातीमोल किंमतीला खरेदी केल्या असत्या. मात्र काही दिवस उलटल्यानंतर हेच व्यापारी हीच तूर पुन्हा ८ हजार प्रति क्विंटल भावाने विकतात. मात्र हा ८ हजारांचा भाव शेतकर्‍यांच्या पदरात पडत नाही आणि ग्राहकांनासुध्दा तुरीची दाळ १०० रुपये प्रति किलो दराने खरेदी करावी लागते. मग आवक झाल्यामुळे भाव कोसळल्याचा फायदा ग्राहकांनाही होत नाही. एकंदरीत भाव कोसळवण्याची व्यापार्‍यांची पध्दती आणि लबाडी यामुळे शेतकरी लुटला जातो. या लबाड व्यापार्‍यांवर सरकारचे कसलेही नियंत्रण नाही ही शेतकर्‍यांची खरी व्यथा आहे. सध्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत खूप चर्चा सुरू आहे. परंतु शेतकर्‍यांची नागवणूक करणारी ही विचित्र व्यवस्था बदलण्याचे नाव कोणीही घेत नाही. जिची खरी गरज आहे शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात सगळे राजकीय पक्षच नव्हे तर शेतीमाल स्वस्तात खरेदी करायला चटावलेले शहरी ग्राहकसुध्दा सारखेच लबाड आहेत. ढोंगी आहेत.

Leave a Comment