एअरटेलने खरेदी केली तिकोनाची ४ जी सेवा


मुंबई – भारती एअरटेलने तिकोना डिजिटल नेटवर्कच्या ४ जी सेवेसह ब्रॉडबॅन्ड वायरलेस एक्सेस स्पेक्ट्रमची खरेदी करण्यासाठी निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले असून १६०० कोटी रुपयांना पाच दूरसंचार सर्कलमधील हा व्यवसाय खरेदी करण्यात येणार आहे. आयडिया आणि व्होडाफोन यांच्या विलीनीकरणानंतर दूरसंचार क्षेत्रात हे दुस-या क्रमांकाचे विलीनीकरण आहे. ४जी डेटा दर आणि वेगामुळे रिलायन्स जिओचा प्रवेश झाल्याने मागे पडत असल्याने कंपनीने मोठा व्यवहार करण्याचा निर्णय घेतला.

एअरटेलकडून तिकोनाच्या गुजरात, उत्तर प्रदेश पूर्व, उत्तर प्रदेश पश्चिम आणि हिमाचल प्रदेश या सर्कलमधील व्यवसायाचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. एअरटेलची उपकंपनी भारती हेक्साकॉम लिमिटेड ही तिकोनाच्या राजस्थानमधील व्यवसायाचे अधिग्रहण करणार आहे. या पाच सर्कलमध्ये २३०० मेगाहर्ट्ज बॅन्डमधील २० मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा तिकोनाकडे ताबा आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्पेक्ट्रम लिलावामध्ये या पाच सर्कलमध्ये व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एअरटेल कंपनीकडून अनेक पावले उचलण्यात आली आहेत. टीडी-एलटीई आणि एफडी-एलटीईमुळे एअरटेलची क्षमता वाढविण्यास मदत होईल. ग्राहकांना अतिवेगवान सेवा मिळण्यास मदत होईल असे कंपनीला वाटते, असे एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक गोपाल विठ्ठल यांनी म्हटले.

Leave a Comment