महिलांबाबत आपली कर्तव्ये


महिलांवरील अन्याय आणि अत्याचार या बाबतीत आपले रेकॉर्ड काही चांगले नाही. आपण संस्कृतीच्या गप्पा मारत असतो पण महिलांना मात्र चांगली वागणूक देत नाही. दोनच दिवसांपूर्वी गोव्यात एक ब्रिटीश पर्यटक तरुणीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रीय गुन्हेगारीविषयक मंडळाने दिलेल्या या संबंधातल्या अहवालात आपल्या देशाचे चारित्र्य दिसून येत आहे. २०११ ते २०१५ या चार वर्षात आपल्या देशातल्या महिलांंवरील अत्याचाराचे प्रमाण ४१.७ टक्क्यांवरून वाढून ५३. ९ टक्के झाले आहे. २०१५ या वर्षात महिलांवरील अत्याचाराचे तीन लाख २७ हजार प्रकार नोंदले गेले आहेत. त्यातील ३४ हजार प्रकरणे बलात्काराची आहेत. याचा अर्थ असा होतो की, २०१५ या वर्षात भारतात बलात्काराच्या दररोज १०० प्रकारांची नोंद होते.

हे प्रमाण चिंता वाटावी असे आहे. अपहरण, हुंडा बळी अशी प्रकरणे तर त्यापेक्षा जास्त आहेत. आपल्या देशात महिला रस्त्यावर सुरक्षित नाहीत, कामाच्या ठिकाणीही सुरक्षित नाहीत आणि घरातही सुरक्षित नाहीत. कारण या वर्षात महिलांवरच्या घरगुती अत्याचाराच्या लाखावर घटना निरनिराळ्या पोलीस ठाण्यांत नोंदल्या गेल्या आहेत. महिलंावरील अत्याचाराच्या संदर्भात नेहमीच एक वस्तुस्थिती सांगितली जात असते. आपल्या देशात त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटना नोंदण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आपल्याला लाखावर घटना नोंदल्याचे दिसत असले तरी न नोंदलेल्या दोन लाखांपेक्षाही अधिक घटना प्रत्यक्षात घडलेल्या असतात.

अशा घटनांच्या बाबतीत सामान्य नागरिक म्हणून आपली अनेक कर्तव्ये असतात पण आपल्याला त्यांची जाणीव नसते. आपण नकळतपणे बोेलता बोलता महिलांच्या संबंधात काही तरी विपरीत बोलून जात असतो. आपला हेतू त्यामागे वाईटच असतो असे नाही पण त्या बोलण्याचे समोरच्या माणसाच्या मनावर सूक्ष्म मानसिक परिणाम होत असतात. बाई ही चेष्टा करण्यासाठीच असते. ती एक उपभोग्य वस्तू असते असे आपण आपल्याही नकळत लोकांच्या मनावर ठसवत असतो. एखादा बलात्कार झाला तर आपण त्याचा निषेध करतोे. आपल्याला तो बलात्काराचा प्रकार ऐकून वाईटही वाटते पण आपणच आपल्या बोलण्याने नकळतपणे अशा प्रकारांना चालना देणारे वातावरण निर्माण केलेले असते. तेव्हा आपण बोलताना आणि वागताना महिलांविषयी फार आदराने बोलले पाहिजे.

Leave a Comment