
मुंबई – आज अधिकृत क्रिकेट कसोटी सामन्याचा १४० वा वर्धापनदिन असून या निमित्ताने गुगलने खास डूडल तयार केले आहे. आजपासून बरोबर १४० वर्षांपूर्वी म्हणजे १८७७ साली क्रिकेटचा पहिला वहिला कसोटी सामना खेळला गेला होता. हा पहिला कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता.
गुगल डुडलच्या माध्यमातून साजरे करत आहे कसोटी क्रिकेटची १४० वर्षे
१८७७ साली क्रिकेटचा हा पहिला कसोटी सामना, त्याकाळी सर्वांना परिचीत असलेल्या इंग्लंड संघामध्ये व त्यावेळी नवीनच असलेल्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये खेळला गेला होता. मेलबर्न स्टेडिअममध्ये झालेल्या या सामन्यात ४५ धावांनी ऑस्ट्रेलिया संघ विजयी झाला होता. या सामन्यात इंग्लंड संघाच्या अल्फ्रेड शॉने सर्वप्रथम गोलंदाजी केली होती. तर ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स बॅनरममने त्याला उत्तर देत उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्यानंतर मेलबर्न स्टेडिअमवर झालेले सलग दोन कसोटी सामने मात्र इंग्लडने जिंकले. आजच्या गुगल- डुडलमध्ये गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक तसेच संघातील इतर खेळाडू लाल चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात असल्याचे, आपल्याला दिसतील.
