बंद होणार नाही दहा रुपयांचे नाणे


मुंबई – सोशल मीडियावर दहा रुपयांचे नाणे बंद होणार असल्याचे संदेश व्हायरल झाल्यानंतर १० रुपयांची नाणी बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली. मात्र दहा रुपयांचे नाणे बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट करताना रिझर्व्ह बँकेने या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

दहा रुपयांच्या नाण्यांचे वितरण नोटाबंदीच्या काळात चलनी नोटांचा पुरवठा मर्यादित असताना वाढले होते. मात्र लवकरच पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांप्रमाणे दहा रुपयांची नाणी रद्द केली जाणार असल्याचे संदेश व्हॉट्‌सऍपवर पसरले आहेत. या संदेशांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी आपल्याकडील दहा रुपयांची नाणी बॅंकांमध्ये जमा करण्याचा पर्याय निवडला आहे.

याबाबत रिझर्व्ह बॅंकेशी संपर्क साधला असता बॅंकेने, हा संदेश अफवा असून, दहा रुपयांचे नाणे बंद होणार नाही. यापुढेही दहा रुपयांची नाणी चलनात कायम राहील, असे स्पष्ट केले. नोटाबंदीच्या काळातही अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर २१ नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बॅंकेने दहा रुपयांचे नाणे चलनात कायम असल्याबद्दल अध्यादेश जारी केला होता.

Leave a Comment