आता खोटी बिले सादर करणा-यांना बसणार मोठा फटका


मुंबई: सर्व नोकरदार मार्च महिना आला की आयकर परतावा मिळवण्यासाठी, वर्षभरातील सर्व अलाऊंस परत घेण्यासाठी धडपडत असतात. त्यात लिव्ह्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल अलाऊंस म्हणजे एलटीए (सुट्टीचा प्रवास भत्ता) सुद्धा असतो. एलटीएसाठी अनेकजण खोटी बिले सादर करतात. पण आता खोटी बिले सादर करणा-यांना मोठा फटका बसणार आहे. कारण आता सरकारच्या नव्या नियमानुसार प्रवास न करता एलटीएची सवलत मिळवता येणार नाही. अशा सवलतींवर आता यापुढे प्राप्तिकर विभाग अधिक बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

आता सरकारी कर्मचा-यांना लिव्ह्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल अलाऊंस (एलटीए) घेताना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण प्राप्तिकर विभागाने एलटीएचे नियम आणखी कठोर केल्यामुळे नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. सुट्टी घेण्यापूर्वीच रजेचा अर्ज दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच एलटीए देण्याचे बंधन केंद्र सरकारने संबंधित संस्थांवर घातले आहे.

एवढेच नव्हे तर एलटीएसोबतच आता घरभाडे भत्ता (एचआरए) आणि गृहकर्जाचे व्याज या प्राप्तिकरात सवलती देणाऱ्या बाबींवरही बारीक लक्ष दिले जाणार आहे. एलटीएसाठीची खोटी कागदपत्रे सादर करणे आता गुंतागुंतीचे होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रवासाच्या ठिकाणी आपण कसे पोहोचलात, प्रवासात आपल्याबरोबर कोण कोण होते आदींबाबतही विचारणा केली जाऊ शकते.

एलटीएचे नियम:
केवळ प्रवासासाठीच कुणीही व्यक्ती एलटीएचा दावा करू शकते. एखाद्या शहरात फिरल्याचा किंवा हॉटेलचा आणि जेवणाचा खर्च त्यासाठी ग्राह्य धरला जात नाही. विमान प्रवास असेल तर फक्त इकॉनॉमी वर्गाचा प्रवासच त्यात ग्राह्य धरला जातो. त्यातही एक अट अशी आहे की, विमानाच्या तिकिटाचे मूल्य सरकारी विमान कंपनीइतके किंवा त्यापेक्षा कमी असायला हवे. रेल्वे प्रवासाची तिकिटे एलटीएसाठी सादर करायची झाल्यास कोणत्याही वर्गात प्रवास केला तरी चालतो फक्त संबंधित प्रवासमार्ग हा दोन शहरांतील सर्वांत जवळचा असावा लागतो. एलटीएची बिले सादर करणे व ती मंजूर करून घेणे कर्मचाऱ्यांसाठी त्रासाचेच काम आहे.

Leave a Comment