विपुलांच पृथ्वी


जगाची लोकसंख्या वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे धान्य या पृथ्वीवर पिकेल का असा प्रश्‍न अनेकांना पडतो. कारण आता जगाची लोकसंख्या ७०० कोटीच्या आसपास असतानाच काही देशांना धान्याची टंचाई जाणवत आहे. मग येेत्या ३० वर्षात ही लोकसंख्या ९०० कोटी झाल्यास त्या लोकसंख्येला हे धान्य कसे पुरणार आहे ? काही लोकांच्या मनात येणारी ही शंका रास्त आहे पण शास्त्रज्ञांना अशी काही शंका येत नाही कारण या पृथ्वीची क्षमता अजून आपल्याला कळलेली नाही. ही क्षमता अफाट तर आहेच पण तिच्या वाढीचीही अपेक्षा आहे. सध्या आपल्या हातात जेवढी प्रगत तंत्रज्ञाने आहेत ती सगळी नीट वापरली तर आताच्या लोकसंख्येच्या ६४ पट लोकसंख्येला खायला पुरेल एवढे धान्य या पृथ्वीवर पिकू शकते अशी ग्वाही शास्त्रज्ञ देत असतात.

नवनवीन तंत्रज्ञाने विकसित होत जातील अशी ही क्षमता अजून वाढत जाणार आहे. तशी तंत्रज्ञाने शोधण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. शेेवटी एक गोष्ट खरी आहे की, शेती आणि अन्नाची निर्मिती म्हणजे वनस्पतीच्या आत चालणारी प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया असते. सूर्यप्रकाश हा त्यांचा मुख्य कच्चा माल असतो. तो वापरण्याची वनस्पतींची क्षमता पुरेशी उपयोगात येत नाही. निसर्गाने जेवढी क्षमता त्यात ठेवली आहे तिचा केवळ एक टक्का वापरला जातो. ही क्षमता वाढवेल तेवढे धान्याचे उत्पादन वाढत जाईल. काही मूलद्रव्यांचा वापर करून ही क्षमता वाढवण्यावर प्रयोग केले जात आहे.

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये कार्यरत असलेले भारतीय शास्त्रज्ञ डॉ. रामसागर मिश्रा यांनी या प्रयोगात एक यशस्वी पाऊल टाकले आहे. गव्हात स्टार्चचे उत्पादन वाढवणारा टी ६ पी हा परमाणू त्यांनी शोधला असून तो गव्हाच्या बियाणात घातला की गव्हाची स्टार्च तयार करण्याची क्षमता वाढते असे त्यांना आढळून आले आहे. त्यांनी या बाबत केलेल्या प्रयोगात या परमाणू मुळे गव्हाच्या उत्पादनात १३ ते २० टक्के वाढ होते त्यांना दिसून आले. हा प्रयोग अंतिमत: यशस्वी झाला तर जगातले गव्हाचे उत्पादन केवळ बियाणातल्या बदलातून २० टक्क्यांंपर्यंत वाढू शकेल असा त्यांचा विश्‍वास आहे. सातत्याने नवे प्रयोग केले तर मानवतेला पुरेल एवढे धान्य निर्माण करण्यात यश येऊ ेशकते. अशाच आणखी एका प्रयोगात गव्हाच्या उत्पादनात १६ टक्के वाढ होण्याची शक्यता दिसून आली आहे.

Leave a Comment