मुंबईत पहिल्या तरंगत्या हॉटेलचे उद्घाटन


मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातही गोव्याप्रमाणेच पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत पहिल्या तरंगत्या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले आहे. मुंबईतील तरंगत्या हॉटेलमुळे पर्यटकांना समुद्राची सफर करता करता मेजवानीचाही आनंद घेता येणार आहे. वांद्रे रेक्लमेशनजवळ ए. बी. सेलेस्टियन या खासगी कंपनीने हे हॉटेल सुरू केले असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, डब्ल्यू बी इंटरनॅशनल कन्सल्टंट्स आणि एबी यांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

अथांग समुद्राचे नयनरम्य दर्शन या तरंगत्या हॉटेलमधून होणार असून, समुद्रातून मुंबईची भव्यताही पाहता येणार आहे. तब्बल १७५ कोटी रुपयांचे तरंगते हॉटेल (जहाज) मुंबईतील समुद्रात अवतरले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मुंबईत येताच गेट वे ऑफ इंडिया, म्युझियम, हेरिटेज वास्तू, हॉटेल, चौपाट्या तसेच धार्मिक स्थळांसह अनेक ठिकाणांना भेटी देतात. मोठ्या संख्येने येणारे पर्यटक पाहता एमटीडीसीकडून मुंबईतील पर्यटनस्थळांना नवा लूक देण्यावर भर दिला जात आहे. चौपाट्यांचा विकास करण्याचा बिग बजेट प्रकल्प हाती असतानाच मुंबईतील समुद्रात तरंगणारे हॉटेल मुंबईकर आणि पर्यटकांसाठी एमटीडीसीने खुले केले आहे.

Leave a Comment